पुणे शहरमुंबई

एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतही पेपरफुटीचा गंभीर आरोप! आमदार रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मुंबई/पुणे : ‘नीट’ परीक्षा प्रकरणावरून देशभरात वातावरण तापले असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’

भरती परीक्षेबाबत एक अत्यंत मोठा आणि गंभीर वाद समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या परीक्षेचा पेपर फुटल्याचा खळबळजनक आरोप केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून फॉरेन्सिक तपास करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

नेमका काय आहे आरोप आणि कसा झाला गैरव्यवहार?

रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२५ रोजी औषध निरीक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी सुमारे ४४,५०० उमेदवार बसले होते, तर १२ जून २०२६ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी म्हणजेच २० मार्च रोजीच काही निवडक उमेदवारांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेची पीडीएफ पाठवण्यात आल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

ज्या उमेदवारांनी पैसे दिले, केवळ त्यांनाच ही प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध करून देण्यात आली होती. मुख्य प्रश्नपत्रिकेमधील १०० पैकी तब्बल ९० प्रश्न आधीच फुटल्याचे त्यांनी पुराव्यानिशी सांगितले. या संपूर्ण रॅकेटमध्ये नंदुरबारमधील एका खाजगी अकॅडमीचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, या गैरप्रकारासाठी प्रति उमेदवार तब्बल १२ लाख रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे.

विद्यार्थ्यांची तक्रार आणि एमपीएससी ची भूमिका

या प्रकारानंतर काही धाडसी विद्यार्थ्यांनी २१ जुलै रोजी एमपीएससी कडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती; परंतु आयोगाने अद्याप यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. उलट, तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी केला आहे.

जर पुढील १० दिवसांत एमपीएससी ने या प्रकरणी योग्य स्पष्टीकरण दिले नाही किंवा कसलीही चौकशी न करता निकाल अंतिम केल्यास, मुंबई किंवा पुण्यात राज्यव्यापी मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page