मराठा आरक्षणाच्या मागण्यावर ओबीसी आक्रमक; कुणबी आणि मराठा वेगळेच

मुंबई : कुणबी आणि मराठा हे वेगळे असून मराठा समाज सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे त्यांनी कुणबी मराठा म्हणून किंवा मराठा म्हणून कुणबी प्रमाणापत्र देखील घेऊ शकत नाही. असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मागण्यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. चौथ्या दिवशीही सरकारकडून कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने मनोज जरांगे यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत आणि याची अंमलबजावणी करण्याची मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे.
कुणबी आणि मराठा हे वेगळे असून मराठा समाज सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे त्यांनी कुणबी मराठा म्हणून किंवा मराठा म्हणून कुणबी प्रमाणपत्र देखील घेऊ शकत नाही. राज्य सरकारला असा जीआर काढण्याचा देखील अधिकार नाही. धनगर समाजाने अशी मागणी केली होती. आम्हाला एसटी प्रमाणपत्र द्या.
सुप्रीम कोर्टाने ती मागणी फेटाळून लावली. मराठा समाजाने ८ टक्के आरक्षण घेतले आहे. एसईबीसी आरक्षण देखील यांना मिळाले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण देखील यांच्याकडे आहे आणि तरी आणखी आरक्षण यांना हवे आहे ते कसे काय मिळू शकेल? हे शक्य होणार नाही. दंडुकेशाहीवर देखील हे आरक्षण घेऊ शकणार नाहीत, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तर ते जातीला देता येते. त्यामुळे डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन केले होते. पण, विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नाही.
याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?
प्रकाश शेंडगे म्हणाले, आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे ते जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?



