महाराष्ट्र

बालविवाहाच्या बेड्या तुटल्या; धाराशिवच्या आंबेवाडीची बालविवाह मुक्तीकडे यशस्वी वाटचाल

धाराशिव | विशेष प्रतिनिधी : बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेला मुळासकट उपटून टाकण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी गावाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. राज्य शासन आणि युनिसेफच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या ‘अंगाई’ मोहिमेला ग्रामस्थांनी असा काही प्रतिसाद दिला की, गेल्या दोन वर्षांत या गावात एकही बालविवाह झाला नसल्याची अधिकृत माहिती युनिसेफने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

या सामाजिक परिवर्तनाचे खरे नायक ठरले आहेत ते म्हणजे गावातील विद्यार्थी. ‘उत्सव समतेचा’ आणि ‘मीना राजू मंच’ या अभियानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील विचारसरणीत बदल घडवून आणला. या मोहिमेत केवळ आंबेवाडीच नाही, तर परिसरातील १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि तब्बल १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

गावागावात आयोजित करण्यात आलेल्या रॅली, ढोल-ताशांचा गजरात निघालेल्या प्रभात फेऱ्या आणि ‘बालविवाह बंद करा, मुलींना शिक्षण द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शाळेतील विद्यार्थ्यांनी नाटक, भाषण, वादविवाद आणि ‘भूमिका परिवर्तन’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश घराघरात पोहोचवला.

या मोहिमेच्या यशात ‘स्वयंशिक्षण प्रयोग’ (SSP), ‘कोरो’ आणि ‘मावा’ या स्थानिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अंगाई-युनिसेफच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह यामुळेच आंबेवाडी आज बालविवाह मुक्त होण्याच्या दिशेने भक्कमपणे उभे आहे.

आंबेवाडीच्या या यशोगाथेमुळे आता जिल्ह्याभरातील इतर गावांमध्येही अशाच प्रकारची मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

“जेव्हा मुले स्वतःच्या हक्कांसाठी आणि सामाजिक बदलासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्याचे परिणाम कायमस्वरूपी असतात. आंबेवाडीने हे सिद्ध करून दाखवले आहे की, जनजागृतीच्या माध्यमातून बालविवाहासारख्या प्रथा थांबवता येतात.”

— युनिसेफ प्रतिनिधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page