सुरक्षेची ऐशीतैशी, फक्त ‘हिरवी जाळी’ लावून पालिका मोकळी! लातूरमध्ये प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे दिव्या आणि कार्तिकने गमावला जीव

विशेष प्रतिनिधी, लातूर : लातूर शहरातील बोधे नगर (उदय नगर) भागातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या अक्षम्य आणि ढिसाळ कारभारामुळे दोन निष्पाप चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. टँकरचे पाणी साठवण्यासाठी प्रशासनाने खोदलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सात वर्षीय चिमुकली आणि पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण लातूर शहरात शोककळा पसरली असून पालिकेच्या या जीवघेण्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर परिसरातील उदय नगर भागात महापालिकेने टँकरचे पाणी साठवण्यासाठी एक मोठा खड्डा तयार केला आहे. या भागात आज सात वर्षीय दिव्या उबाळे आणि पाच वर्षीय कार्तिक कांबळे ही दोन लहान मुले नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळत होती. खेळता खेळता ही मुले या पाण्याच्या खड्ड्यापाशी गेली. मात्र, खड्ड्यात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही या खोल खड्ड्यात पडले आणि दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. काही वेळाने मुले दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, हा थरारक प्रकार उघडकीस आला.
सुरक्षेच्या नावाखाली केवळ ‘हिरवी जाळी’चा फार्स!
या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पालिकेने एवढा मोठा पाण्याचा खड्डा तयार केला असताना, सुरक्षेची कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती. खड्ड्याच्या बाजूने कोणतीही पक्की भिंत किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. सुरक्षेच्या नावाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केवळ एक ‘हिरवी जाळी’ लावून हा मृत्यूचा सापळा वाऱ्यावर सोडून दिला होता. वाऱ्याने ही जाळी देखील अनेक ठिकाणी उखडली गेल्याचे नागरिक सांगत आहेत. पालिकेच्या याच बेजबाबदार आणि ढिसाळपणामुळे या दोन निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला असल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
नागरिकांमध्ये प्रचंड संताप, दोषींवर कारवाईची मागणी
दोन चिमुकल्यांचा प्रशासनाच्या चुकीमुळे जीव गेल्याने बोधे नगर परिसरातील नागरिक अत्यंत आक्रमक झाले आहेत. “पालिका कर गोळा करते, पण नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचे काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या दुर्घटनेला सर्वस्वी लातूर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असून, संबंधित ठेकेदार आणि निष्काळजीपणा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन आता काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे.



