दूध भेसळ प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्त होणार – दिलीप वळसे पाटील

पुणे : दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. दूध भेसळ प्रकरणाशी आपला संबंध जोडणे हे संपूर्णपणे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दूध भेसळ किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर कृत्याशी आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास, एका क्षणाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली प्रतिक्रिया देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस यंत्रणा दूध भेसळ प्रकरणाचा कसून तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी या यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिकाला पाठीशी घालण्याचा किंवा संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कायदेशीर कारवाईची मागणी आणि राजकीय बदनामीचा आरोप
या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोर आणि कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोणताही पुराव नसताना आपले नाव या प्रकरणाशी जोडून जाणीवपूर्वक राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून, हे एक नियोजनबद्ध षड्यंत्र असल्याचा दावाही वळसे पाटील यांनी केला आहे.



