कर्नाटकात खाजगी प्रशिक्षण विमानाचा अपघात; अपघातात विमानाचे दोन तुकडे
बंगळुरु : विजयपुरा जिल्ह्यातील बालासोर तालुक्यात रेड बर्ड खाजगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानात दोन जण होते, दोघेही जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बालासोर पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. ही घटना बालेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “हे रेड बर्ड एव्हिएशनच्या मालकीचे एक खाजगी विमान आहे. ते कलबुर्गीहून बेलागावीकडे उड्डाण करत असताना त्याच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते अचानक कोसळले. विमानात कॅप्टन आणि एक प्रशिक्षणार्थी पायलट असे दोन जण होते. विमान जमिनीवर आदळल्याने त्याचा दर्शनी भाग आणि पंखांचे नुकसान झाले आहे. विमानाने लोकवस्ती असलेल्या भागात न कोसळता रिकाम्या मैदानाचा आधार घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हे विमान रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीद्वारे चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. रेडबर्ड एव्हिएशन ही भारतातील एक आघाडीची उड्डाण प्रशिक्षण अकादमी आहे. ती सेस्ना १७२ टँगो चार्ली खाजगी जेटवर उड्डाण प्रशिक्षण देते, प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाच्या विमानांचा वापर करते. अकादमी बारामती, बेळगावी आणि सिवनी येथील त्यांच्या तळांवरून पायलट प्रशिक्षण देते.



