तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी पैशासाठी केली व्यावसायिकाची हत्या
क्राइम पेट्रोल' बघून झुडपात लपविला मृतदेह

नागपूर : तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी पैशासाठी व्यावसायिकाची हत्या केली. तीनही आरोपींना ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृताची ओळख पटू नये यासाठी ‘क्राइम पेट्रोल व गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अन्य मालिका यूट्युबवर पाहून त्यानुसार गुन्हा केला.
आर्यन नरेश शेंडे (वय २२, रा. व्यंकटेश कॉलनी, नंदनवन), रिशांख तारेश कांबळे (वय २०, रा. शिल्या सोसायटी, बेलतरोडी) व अनूज रमेश वाघमारे (वय १९, रा. हिवरीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. व्यावसायिक सुचित उपासराव भोजापुरे (वय ४४, रा. बाबा त्रिमूर्ती सोसायटी, वाडी) यांची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर या तीन विद्यार्थ्यांनी ‘क्राइम पेट्रोल’मधील मालिका पाहून त्यांचा नग्नावस्थेतील मृतदेह झुडपात लपविला होता.
आर्यन शेंडे याने पोलिसांना ही बाब सांगितली असून तोच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
गुरुवारी सकाळी सुचित हे वर्धमाननगरमधील उड्डाण पुलावर मद्यधुंद अवस्थेत होते. तिघांनी त्यांना मदतीविषयी विचारणा करत आधी भिवापूरला घेऊन गेले. सायंकाळी ते वाडी येथे आले. घरी कोणी नसल्याने आर्यनने त्यांच्या हत्येचा कट आखला. सुचित यांची कार काही दिवस आपण वापरू व पुढे कार विक्रीतून मिळालेले पैसे समान वाटून घेऊ, असे आमिष देत मित्रांना यात सहभागी करून घेतले.
त्यानुसार, सुचित यांचे कपडे काढले. नग्नावस्थेत सुचित यांचा मृतदेह स्मशानघाटाजवळील झुडुपात लपविला. त्यांचे कपडे, दोन मोबाइल व अन्य साहित्य घेऊन कारसह हे तिघेही पसार झाले. मात्र पोलिसांनी कार, कपडे जप्त केल्यावर आर्यन, रिशांख व अनुजला ताब्यात घेतले. गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक करून वाडी पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन चरडे करीत आहेत.



