गुन्हेगारीराष्ट्रीय

मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचाराचा आगडोंब

पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंदीसह कर्फ्यू लागू

मणिपूर : मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात झालेल्या एका घरावरील रॉकेट हल्लात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून या कारणामुळे तेथे हिंसाचार उसळला. अल्पवयीन मुलांच्या मृत्यूची बातमी पसरताच बिष्णूपूरमध्ये आंदोलन भडकले. स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला. टायर जाळून रस्ते अडविण्यात आले असून संतप्त जमावाने दोन तेल टँकरसह तीन ट्रकही जाळले.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने त्वरित मणिपूरमधील इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णूपूर या पाच जिल्ह्यामध्ये तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली असून ज्या बिष्णूपूरमध्ये कथित रॉकेट हल्ला झाला, तिथे संचारबंदी लागू केली आहे.

मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यातील मैतेई-बहुल खोरे आणि कुकी-झोमी बहुल टेकड्या यांच्यातील संवेदनशील सीमेवर असलेल्या ट्रोंगलाओबी अवांग लेकाई या गावात मंगळवारी पहाटेच्या वेळी रॉकेट हल्ला झाला. या स्फोटात घरात झोपेत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या नवजात बहिणीचा मृत्यू झाला. मुलांची आई गंभीर जखमी झाली.

या घटनेनंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. या दोन मुलांच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने देण्यात आली. यात सीआरपीएफने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुलांच्या आईवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित अतिरेक्यांनी घरावर स्फोटके फेकल्यामुळे दोन मुलांचा झोपेतेच मृत्यू झाल्याचा आरोप मुलांच्या आजीने केला.

हिंसक झालेल्या आंदोलकांनी मोइरांग पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर जळती लाकडे मांडून ठेवली आणि पोलीस ठाणेही अडवले. इंफाळमध्ये आंदोलक अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निदर्शकांनी रस्ते अडवून जळते टायर रस्त्यावर पसरवले. ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

मणिपूरचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी या घटनेचा निषेध करत या घटनेला रानटी कृत्य आणि मानवतेवरील उघड हल्ला असे म्हटले. या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढले जाईल आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देत दहशतवादी कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page