संपादकीय अग्रलेख

अग्रलेख : भूमाफियांची दबंगगिरी

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिचं कुटुंबच वादग्रस्त ठरतं आहे. गावोगावी खरेदी केलेल्या जमिनी आणि त्यासाठी केलेली दादागिरी चर्चेत आहे. सेवेत असताना दोनदा निलंबित झालेल्या तिच्या बापाची, दिलीप खेडकर याची खाबुगिरीही पुढे येते आहे. अधिकाराचा फायदा घेत त्यानं चौकशीच्या नावाखाली ३०० /३५० उद्योजकांना त्रास दिला होता. सरकारनं त्याची असली भ्रष्ट सेवा मुदतपूर्व समाप्त करुन त्याला लगाम घातला. मुळशीतील शेतकऱ्याला

पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर ही पोलीस कोठडीत गेली. ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा, वडील दिलीप व अंगरक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आजपर्यंत जमिनी बळकावण्याच्या घटनांमध्ये गुंड, गुन्हेगार असल्याचं दिसत होतं. मनोरमा सारखी बाई सुध्दा पैसा आणि ताकदीचं पाठबळ असल्यावर मनोमन दबंगगिरी करु शकते. हातात पिस्तूल घेऊन धमकावत असतानाचा तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर लॅंडमाफिया, भूमाफिया हा शब्द पुन्हा ऐकू येऊ लागला आहे.

गुन्हेगारी टोळ्या आणि भूमाफिया धमकावून सर्वसामान्यांच्या मालमत्तेवर कब्जा करतात. मालकी हक्क असूनही पीडित जमीन मालकाला मालमत्तेतून बेदखल केलं जातं. मालमत्तेचा ताबा आपल्या इच्छेविरुद्ध असू नये हा मालमत्तेच्या मालकाचा हक्क असतो. अशा स्थितीत घर किंवा जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याच्या प्रकरणात पुण्यासह महाराष्ट्रात वाढ  होते आहे. एकेकाळची संतांची ही भूमी भूमाफियांना लूट करण्यासाठी सुपीक बनली आहे.

जमिनींवर, घरांवर ताबा मारणं, क्लिअर टायटल जमिनींमध्ये ‘लिटिगेशन’ करून लुबाडणूक करणं, घरमालकाला दादागिरी करून भाड्याची घरे बळकावणं किंवा विनापरवाना हाॅटेल्स, लाॅंड्री,किराणा किंवा तत्सम दुकाने सुरू करणे, कायद्याच्या पळवाटा शोधून स्वतःचा फ्लॅट खरेदी करुनही भाड्याच्या घरावर कब्जा, ताबा कायम ठेवणं अशा घटना पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहेत.‌ खासगी, सरकारी जमिनींवर ताबा मारुन अशा जमिनी वादग्रस्त करायच्या आणि साम,दाम, दंड, भेद निती अवलंबून त्या गिळायच्या किंवा त्यांची मालकी प्रस्थापित करायची असं दुष्टचक्र महानगरांमध्ये वेगानं मूळ धरू लागलं आहे.

जमीन किंवा घरमालकांची पध्दतशीर फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळीतीलच काही जण प्रथम फसवणूक करतात. नंतर फसवणूक झाल्याचे सांगणारा टोळीतलाच दुसरा एकजण पुढे येतो. तो तुम्हांला जमिनीची ‘लिटीगेशन’ मिटवून देतो, गुन्हा दाखल करून देतो, पैसे वसूल करून देतो असे सांगतो. असे लोक सर्रास पर्यायी कायद्याची दुकाने थाटत आहेत. पोलीस ठाण्यांमधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्रासपणे जमिनीची वाद मिटवून दिले जात आहेत. बनावट कागदपत्रे अथवा मृत व्यक्तींच्या नावे जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात. याबाबत अनेक गुन्हे दाखल झाले. परंतु, ज्यांची खरेच फसवणूक झाली आहे ते पोलीस ठाण्यांपासून लांबच राहतात. अन्यच लोक स्वतःचा हेतू साध्य करतात. ‘तुला ना मला घाल कुत्र्याला’ अशी अवस्था घरमालक भाडेकरू वादात मोठ्या प्रमाणात आहे.

मुंबई , पुण्यासारख्या महानगरांमध्ये बेकायदेशीरपणे मालमत्तेवर कब्जा केल्याची अनेक प्रकरणे आहेत. कष्टाच्या पैशाने विकत घेतलेली जमीन किंवा घर-दुकान कोणी ताब्यात घेतले तर ते मालकाला फारच तणावग्रस्त करणारे असते. अशा स्थितीत पीडिताला ‘तारीख पे तारीख’ न्याय व्यवस्थेचा आधार घ्यायचा, पोलिसांकडं जायचे की भाई, दादाकडूनच जागा मोकळी करून घ्यायची हे समजत नाही. वर्षानुवर्षे अशी प्रकरणे भिजत पडलेली असतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे खूप गुंतागुंतीची असतात, त्यामुळे बहुतेक लोकांना ती समजत नाहीत. किचकट कायदे न्याय मिळवून देण्यासाठी अपुरे आहेत. दिवाणी कायदे तर घरमालकावर अन्याय करणारे आहेत की काय अशी शंका येते. त्या त्या राज्याला भाडे नियंत्रण कायद्याचे नियम करण्यासाठी मुभा आहे. बहुसंख्य असलेल्या भाडेकरुंच्या मतांवर डोळा ठेवून तसे कायदे केले गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

पुणे शहर-जिल्ह्यात जमिनींच्या व्यवहारात अफरातफर करणाऱ्या कुख्यात गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.  पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक लॅंडमाफिया उदयास आलेत. त्यांना पोलीस , महसूल यंत्रणा यांची छुपी फूस असते. त्या त्या भागातले गुंड, गुन्हेगार,  यांचेही मोक्याच्या जमिनींवर आणि घरमालक, भाडेकरू वादातील वाड्यांवर किंवा चाळींवर लक्ष असतं.

पुण्यात किंवा मुंबईत आधीच्या गुन्हेगारीचं स्वरूप मटके, जुगार,खंडणी किंवा गांजा, चरस अशा प्रकारच्या अवैध धंद्याचं होतं. रिअल इस्टेटचा पैसा या गुन्हेगारांच्या हाती आला. या पैशाचं प्रमाण आधीच्या तुलनेत कित्येक पटीनं गब्बर होतं. त्यांच्याकडे लॅंड रोव्हर, जॅग्वारसारख्या गाड्या आल्या. हिंजवडी, मुळशी, फुरसंगी, हडपसर, माण, कात्रज अशा प्रत्येक भागात गॅंग्स उभ्या राहिल्या. त्यावरूनच त्यांच्यातील वाद आणि संघर्ष विकोपाला जाऊन भीषण गॅंगवारला सुरुवात झाली.

काही वर्षांपूर्वी टोळ्या, त्यांच्यातला संघर्ष तीव्र होता. खंडणी घेणं, जमीन मोकळी करणं, जमिनीवर ताबा मिळवून ती विकणं अशी कामं या टोळ्या करत असत. या टोळ्यांना बिल्डर लॉबीकडून पाठबळ मिळत असे. यातून भयंकर टोळ्या उभ्या झाल्या. एका रात्रीत श्रीमंत होणाऱ्या नगरसेवक किंवा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही बिल्डर लॉबीने आधार दिला. असे राजकारणी स्वतःच बिल्डर झाले किंवा बिल्डर्सच्या पदरी छुप्या पध्दतीने राहून त्यांनी महानगर पालिकेत अडणारी कामे सोडवून दिली. आमदार किंवा खासदार स्तरातले लोक नामवंत बिल्डरचे पार्टनर असतात ही बाब लपून राहिलेली नाही.

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात जे दाखवलं गेलं आहे ते फक्त मुळशी किंवा पुण्यापुरतं मर्यादित नाही. तर अवघ्या महाराष्ट्राची ही खरोखरच अधोगतीची कथा आहे.

– नरसिंग कांबळे

मुख्य संपादक, महाराष्ट्र मिशन 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page