संपादकीय लेख : टोल फ्री हेल्पलाईन नंबरची टोलवाटोलवी, ‘टेलिमानस’ ने मात्र गाठला १० लाख काॅल्सचा उच्चांक
आपली सरकारं, मग ती स्थानिक असोत की प्रादेशिक किंवा केंद्रीय स्तरावरची…आजवर त्यांनी दरवर्षी काय काय नव्या घोषणा केल्या आणि त्यातल्या किती खरोखरच अंमलात आल्या आणि दीर्घ काळ सुरू राहिल्या याचा नीट शोध घेतला तर आपण चक्रावून जाऊ.
नवा महापौर असो, नवा मुख्यमंत्री असो की पंतप्रधान किंवा पोलीस आयुक्त असो की महानगर पालिका आयुक्त असो त्यांनी खुर्चीचा ताबा घेतला,की काही तरी नवीन घोषणा केलीच समजा. अशा घोषणा आणि आश्वासनाच्या पावसात भारतीय जनता आजवर मनसोक्त भिजून निघाली आहे. प्रत्यक्षात काय दिसतं? तर आजही मीठ मिरचीसाठी कोणाच्या शेतात राबायला जाणारी माणसं जीप किंवा टमटमला अक्षरश: लटकून जाताना दिसतात तर दणकून पगार असलेला एखादा सरकारी बाबू निम्म्या तिकिटात विमानाने किंवा रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातून जात असतो.
मोबाइल, संगणक, इंटरनेट,सोशल मीडिया यांचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला. तसतशी सरकारे सुध्दा जनतेच्या सेवेसाठी आधुनिक बनली. बहुतेक सर्व सरकारी खात्यांच्या टोल फ्री हेल्पलाईन सुरू केल्या गेल्या.
२५ वर्षांपूर्वीचे, अशा हेल्पलाईनचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालयात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने हेल्पलाईन सुरू केली. तत्कालीन आरोग्य मंत्री दौलतराव आहेर यांच्या हस्ते या हेल्पलाईनचं उद्घाटन झालं. एड्स या महाभयंकर रोगाबाबत शंका समाधान करणारी ही हेल्पलाइन होती. तिला प्रतिसाद सुध्दा चांगला मिळत होता. परंतु,ती काही महिन्यातच बंद पडली. यानंतर अनेक हेल्पलाईन सुरू केल्या गेल्या. त्यातल्या एकाही सुविधेचा अनुभव नागरिकांना समाधानकारक वाटला नाही. एखाद्या हेल्पलाईनचा नंबर डायल करून पाहा.पलिकडून काहीही प्रतिक्रिया येत नाही. रिंग वाजत राहते. काही हेल्पलाईनचा तर नंबरच डायल होऊ शकत नाही. एखादी हेल्पलाईन सुरू असलीच तर तिच्याकडून मिळालेल्या निराशाजनक प्रतिसादामुळे पीडित लोक पुन्हा हेल्पलाईनचा नंबर डायल करण्याच्या फंदात पडत नाहीत. पीएमपीएमएलच्या हेल्पलाईनचा नंबर डायल करुन पाहा. प्रवाशांच्या कुठल्याही तक्रारीची तड लागतच नाही.
स्थानिक पातळीवर तर अत्यंत बोगस हेल्पलाईनचा सुळसुळाट असतो.पुण्यात तर अशा हेल्पलाईनमुळे सुविधा होण्याऐवजी वैताग जास्त येतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘नॅशनल टेली-मेंटल हेल्थ प्रोग्रॅम – टेलिमानस’चा (Tele MANAS ) अनुभव मात्र आश्चर्यकारक आणि उपयोगी पडणारा आहे.
‘टेलिमानस’ ने एक मोठा टप्पा गाठला आहे. संबंधित टोल-फ्री नंबरवर आतापर्यंत १० लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. दररोज सरासरी ३५०० कॉल्स देशभरातून येत असतात. तथाकथित, निष्क्रिय हेल्पलाईन्सच्या पार्श्वभूमीवर ‘टेलिमानस’ हा दिलासादायक पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित यंत्रणा अभिनंदनास पात्र आहेत.
केंद्र सरकारची राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन ‘TeleManas’ ही टोल-फ्री सेवा आहे. ती २०२२ या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाल्यापासून देशाच्या विविध भागांतून दोन लाखांहून अधिक फोन कॉल्स आले. याचाच अर्थ कोरोना काळानंतर सामान्य लोकांच्या मानसिक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असाही आहे. हेल्पलाइनवर कॉल्सची संख्या वेगाने वाढली आहे. एप्रिल २०२३ मध्ये एक लाख कॉल्ससह ही संख्या अवघ्या तीन महिन्यांत दोन लाखांवर पोहोचली. मानसिक समस्यांनी पीडित लोक या हेल्पलाईनचा आधार घेतात. सर्वात सामान्य चिंतांमध्ये शांत झोपेचा अभाव, तणाव आणि चिंता, बेरोजगारी , व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद आदींचा समावेश होतो.
टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 14416 किंवा 1-800-891-4416 बहुभाषिक तरतुदीसह उपलब्ध आहे. कॉलरना सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या आवडीची भाषा निवडण्याची परवानगी आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४२ कार्यात्मक टेली मेंटल हेल्थ अँड नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टम (MANAS) सेलसह, सेवा सध्या २० भाषांमध्ये दररोज साडेतीन हजार हून अधिक कॉल हाताळत आहे. १९०० हून अधिक समुपदेशकांना प्रशिक्षित केले गेले आहे आणि ते फ्रंट लाइन सेवा चालवत आहेत.
परीक्षेदरम्यान तणावाशी संबंधित कॉल्समध्ये वाढ झाल्याचे ‘टेलिमानस’ ला दिसून आले होते. या कॉलर्सना मदत करण्यासाठी उपयुक्त समुपदेशन आणि स्व-मदत धोरणांसह समुपदेशकांनी मदत केली. विविध शैक्षणिक संस्थांमधील अधिकाधिक विद्यार्थी/किशोरांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न केला जात आहे. प्रिंट मीडिया, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या विविध माध्यम प्लॅटफॉर्मद्वारे टेलि मानस सेवांचा प्रचार केला जात आहे.
TeleManas आगामी काळात कॉलर्सना मूलभूत समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल, ज्यात ई-संजीवनीसह विद्यमान गंभीर सेवा आणि संसाधने यांचा समावेश आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय दूर-मानसिक आरोग्य कार्यक्रम – Tele MANAS – ने एक मोठा टप्पा गाठला आहे. या सेवेचा अधिकाधिक प्रसार होत गेला तर सर्वसामान्य मानसिक पीडितांना मोठा आधार होईलच. रस्त्यांवर भिकाऱ्यांसारख्या, गलिच्छ अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णांवर सुध्दा उपचार करून त्यांचे पुनर्वसन झाले तर शेकडो पीडित कुटुंबांना नवसंजीवनी मिळेल.



