सनातन धर्माचे ‘गवई’ आणि सरन्यायाधीशांचे भूषणास्पद उदारमन

२०१४ पासूनचे राजकारण बदललेले आहे. नुकतेच याच खिलाडूवृत्ती मान्य नसलेल्यांनी क्रिकेट मैदानावर विद्वेष व राजकारण पसरवले. विरोधी आवाज दाबून टाकणाऱ्या प्रवृत्तीने सोनम वांगचुक यांना जेलमध्ये डांबले. नंतर थेट सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयातील सरन्याधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
प्रतिकात्मक हिंसाचाराचे बळी ठरलेले न्यायमूर्ती सामान्य व्यक्ती नव्हते. बौद्ध पार्श्वभूमीचे पहिले सरन्यायाधीश भूषण रामचंद्र गवई वंचिततेपासून सक्षमीकरणापर्यंतच्या प्रवासाचे जिवंत प्रतीक आहेत. सर्वोच्च पदावर त्यांची नियुक्ती ही शतकानुशतके चालणाऱ्या सामाजिक भेदभावासाठी जिवंत उत्तर आहे.
१९९० नंतर धर्मांधता व जातीय विद्वेष सार्वत्रिक झाला आहे. २०१४ पूर्वी सुध्दा तो काही प्रमाणात होता. आज तो उफाळलेल्या अवस्थेत आहे. खजुराहोमध्ये भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धारासाठीच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी.आर. गवईंनी ‘तुम्ही म्हणता की तुम्ही विष्णूचे कट्टर भक्त आहात. जा आणि देवतेलाच काहीतरी करायला सांगा. जा आणि प्रार्थना करा.’ अशी टीका केली. त्याचे काही सुप्त परिणाम होणार आहेत आणि दबक्या आवाजात या वक्तव्यावर बोलले जाणार आहे याची कल्पना गवईंनीही केली नसावी.
७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या घटनेने सर्वांना धक्का बसला. स्वतः गवईंना आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांना या घटनेचा खूप धक्का बसला. ‘सनातन धर्म का अपमान – नही सहेगा हिंदुस्थान ‘ ही घोषणा त्या बूट फेकण्याचा प्रकार करणाऱ्या वकिलाने दिली. एकीकडे, ‘सनातन धर्म’ म्हणजे शाश्वत कायदा संरक्षित करण्याचा दावा केला जात होता आणि दुसरीकडे, या संरक्षणाच्या नावाखाली, प्रजासत्ताकाच्या स्थापित कायद्याचेच उल्लंघन केले जात होते. सर्वोच्च न्यायालय हे मंदिर किंवा मशीदी सारखे धार्मिक उपासनेचे केंद्र, श्रद्धेचे व्यासपीठ नाही. संविधानाचा निष्पक्ष आरसा आहे. तरीही, अशांततेच्या त्या क्षणी, न्यायालय कायदेशीर युक्तिवादांच्या सखोल विचारमंथनाऐवजी धार्मिक घोषणेने गुंजले.
हा हल्ला सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे. तरी गोंधळादरम्यान, सरन्यायाधीश शांत राहिले आणि त्यांनी कामकाज सुरू ठेवले.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक तक्रार दाखल केली नाही. मुख्य न्यायाधीशांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई सुध्दा करू नये असे सांगितले. तरीही, दिल्ली पोलिसांनी राकेश किशोर यांची न्यायालयाच्या आवारात अनेक तास चौकशी केली. नंतर त्यांना सोडून दिले. नंतर त्यांचा बूट परत करण्यात आला. आता तेच राकेश किशोर आपण स्वतः दलीत असल्याचा दावा करत आहेत. तशी कागदपत्रे दाखवयालाही ते तयार आहेत. असे असेल तर मग सनातन धर्माचा कथित अपमान झाला असेल तर त्यांची मजल बूट फेकण्यापर्यंत का गेली?
गवईंनी जरी मोठ्या मनाने सांगितले असेल की ते अश्या भ्याड गोष्टींमुळे विचलित होत नाहीत तरीही लोकशाही, संविधान मानणारा देशवासीय विचलित झालेला आहे. त्या वकिलाचा संबंध सनातन धर्मांधतेशी असणार. त्याच विचारधारेचा संबंध संघाशी आणि केंद्रीय सत्तेशी आहे. त्यामुळे ऍट्रॉसिटीचा खटला गवईंनी दाखल करावा अशी मागणी केली जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई बौद्ध समाजाचे आहेत ही बाब सगळ्यांना माहिती आहे. राकेश किशोर यांना सुद्धा माहिती असणार.
या घटनेचा देशभरात विशेषतः महाराष्ट्रात व्यापक निषेध करण्यात आला. मात्र या घटनेमागील कार्य कारणभाव समजावून घेणे सुध्दा आवश्यक आहे. हिंदू देवतेबद्दल काही टिप्पण्या करून बूट फेकण्याच्या घटनेला आमंत्रण दिले गेले असेल तर अशी वक्तव्ये आजकालच्या कडव्या वातावरणात अयोग्य आणि अनावश्यक आहेत, असे जाणकारांचे मत आहे.
वास्तविक, न्यायाधीश हा फक्त न्यायाधीश असतो. तो कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे असतो. न्यायाधीशांनी न्यायालयात कमी बोलले पाहिजे आणि उपदेश, प्रवचन किंवा व्याख्यान देऊ नये, असा संकेत आजकाल धुडकावले जातात. न्यायाधीशांनी ताशेरे ओढत बसण्यापेक्षा न्याय देण्याचे काम केले तर लवकरात लवकर अनेक खटले निकाली निघतील.
या देशात वर्षानुवर्षे फौजदारी, दिवाणी खटले प्रलंबित राहतात. न्यायाधिशांची संख्या प्रचंड खटल्यांच्या मानाने तोकडी आहे. न्याय मिळण्यासाठी अनेक कच्चे कैदी तुरुंगात खितपत पडले आहेत. ‘तारीख पे तारीख ‘ चे चक्र आजही सुरू आहे. न्याय व्यवस्थेवरचा सामान्य लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक लोक कोर्टाची पायरी चढत नाहीत. अन्याय सहन करत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरन्यायाधीशांचे काय विचार आहेत ते पुढे आले पाहिजे. या साऱ्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची रोकड सापडलेल्या दिल्लीच्या न्यायमूर्तीवर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही, चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीची एकही बैठक झाली नाही. त्याचा जाब विचारण्याचे औचित्य या देशातील संविधानाची राखण करणाऱ्या एका तरी न्यायाधिशाकडून दाखवले जावे. ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही.
परंतु आता हे प्रकरण गवईंकडून विसरले गेले आहे. तथापि वकिलाच्या या कृत्याला अक्षम्य म्हणत सरन्यायाधीशांच्या उदारतेचे कौतुक केले पाहिजे. अनेक संस्कृतींमध्ये, बूट फेकणे हे अवमानाची अंतिम रित मानली जाते. तरीही या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. अशा गोष्टी माझ्यावर परिणाम करत नाहीत, हे गवईंचे उद्गार आणि भूमिका तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा भाव आणि क्षमा बुद्धीचे संस्कार असू शकतात. वकील संघटना आणि माध्यमांनीही याच क्षमा बुद्धीचे अनुकरण केले पाहिजे.



