नवी दिल्लीसामाजिक

नारीशक्ती वंदन अधिनियम’साठी सर्व पक्षांनी एकमुखाने पाठिंबा द्यावा, यासाठी पंतप्रधानांचे आवाहन

खासदारांना ऐतिहासिक प्रयत्नाचा भाग असल्याचा अभिमान नेहमीच वाटेल : मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’साठी सर्व पक्षांनी एकमुखाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन पत्राद्वारे केले आहे. १६ एप्रिलपासून संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित एक ऐतिहासिक चर्चा होणार आहे. हे विशेष अधिवेशन आपली लोकशाही अधिक मजबूत करण्याची एक संधी आहे. तसेच, सर्वांना सोबत घेऊन एकत्रितपणे पुढे जाण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हा एक क्षण आहे. याच भावनेने आणि उद्देशाने मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मी हे पत्र लिहित आहे जेणेकरून आपण सर्वजण एकजुटीने ही दुरुस्ती मंजूर करू शकू. अनेक खासदारांनी या विषयावर संसदेत आपली मते व्यक्त केल्यास ते उत्तम होईल. हा क्षण कोणत्याही एका पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या पलीकडचा आहे. महिला आणि आपल्या भावी पिढ्यांप्रति जबाबदारी दाखवण्याचा हा क्षण आहे. सर्व राजकीय पक्षांनी बऱ्याच काळापासून राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने, ही आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्याची हीच योग्य वेळ आहे.

ही राष्ट्राच्या नारीशक्तीसाठी आणि १४० कोटी भारतीयांसाठी एक महान उपलब्धी असेल. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व एकत्र येऊन संसदेत हा ऐतिहासिक पराक्रम घडवून आणू, असे ते म्हणतात.

मोदी यांनी म्हटले आहे की नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या खासदारांना या ऐतिहासिक प्रयत्नाचा भाग असल्याचा अभिमान नेहमीच वाटेल. त्यामुळे, आपण ही संधी गमावता कामा नये. नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्याच्या दुरुस्तीसाठी तुमचा पाठिंबा, ही आपल्या देशातील महिलांप्रति असलेल्या एका महत्त्वाच्या जबाबदारीची पूर्तता ठरेल.

कोणताही समाज तेव्हाच प्रगती करतो, जेव्हा महिलांना प्रगती करण्याची, निर्णय घेण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेतृत्व करण्याची संधी मिळते. भारताला एक विकसित राष्ट्र बनण्याचे आपले ध्येय साकार करण्यासाठी, या प्रवासात महिलांनी अधिक मोठी आणि सक्रिय भूमिका बजावणे अत्यावश्यक आहे, असे मोदी यांनी म्हटले असून आज आपण सर्वजण सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढता सहभाग पाहत आहोत. अंतराळापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, सशस्त्र दलांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत, भारताच्या कन्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. आपल्या कठोर परिश्रमाने आणि दृढनिश्चयाने त्या आपली क्षमता सिद्ध करत आहेत, असे पत्रात नमूद केले आहे.

मोदी यांच्या पत्रातील मुद्दे असे: संसद आणि राज्य विधानमंडळांमधील महिला आरक्षणाचा मुद्दा अनेक दशकांपासून चर्चेत आहे. २०२३ मध्ये, सर्वपक्षीय खासदार संसदेत ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले. तो एक अविस्मरणीय क्षण होता, जो आपली एकता दर्शवत होता. देशातील महिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सामूहिकरित्या एक मोठा निर्णय कसा घेण्यात आला, हे संपूर्ण जगाने पाहिले. महिला आपल्या लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या आहेत आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने हे एक भक्कम पाऊल होते. मी तो दिवस भारताच्या संसदीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा मानतो.

नारी शक्ती वंदन अधिनियमावरील चर्चेत अनेक खासदारांनी आपले योगदान दिले. त्या चर्चेदरम्यान, त्याच्या अंमलबजावणीच्या वेळेवरही स्पर्श करण्यात आला. या ऐतिहासिक कायद्यातील तरतुदी लवकरात लवकर लागू व्हाव्यात यावर व्यापक एकमत झाले. अनेक पक्षांचे नेते याच मताचे होते. अलीकडच्या काळात, आम्ही या विषयावरील तज्ञांशी सल्लामसलत केली आहे. आम्ही घटनात्मक बाबींमध्ये पारंगत असलेल्यांकडून सूचना आणि मार्गदर्शन घेतले आहे. आम्ही राजकीय पक्षांशीही संवाद साधला आहे.

विस्तृत विचारविनिमयानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, आता देशभरात ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ त्याच्या खऱ्या अर्थाने लागू करण्याची वेळ आली आहे. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणासह घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे भारताच्या लोकशाही संस्थांमध्ये नवी ऊर्जा संचारेल आणि जनतेचा विश्वास दृढ होईल. तसेच, यामुळे शासनामध्ये अधिक सहभाग आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page