गुन्हेगारीपुणे शहर

कर्तव्य कठोर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बदलीची असंतुष्टांना आस

गैरप्रकारांना सोकावलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वरकमाईची स्वप्ने भंगल्याचे कारण

पुणे: गुन्हेगारीची साफसफाई करण्यासोबतच पुणे शहर पोलीस दलात किमान शिस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची ‘ चांगले अधिकारी ‘ अशी त्यांची प्रतिमा सामान्य पुणेकरांतही आहे. मात्र त्यांचा धसका गैरप्रकारांना सोकावलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आहे.‌ त्यामुळे अमितेशकुमार यांची बदली कधी होते आणि आपली वरकमाई कधी सुरू होते याकडे संबंधित लक्ष ठेवून आहेत.भ्रष्ट आणि गैरप्रकारांना सोकावलेल्या अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अमितेशकुमार यांची बदली व्हावी अशी जबरदस्त इच्छा आहे. त्यासाठी ते ‘देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. या वाक्प्रचाराचा अर्थ मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला पाण्यात ठेवणे, संकट दूर करण्यासाठी देवाकडे साकडे घालणे असा आहे.

 

अमितेशकुमार नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून सप्टेंबर २०२० पासून कार्यरत होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी पुण्याच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतली. त्यापूर्वी बालगुन्हेगारांनी आणि कोयता गॅंग, तोडफोड टोळ्या, संघटीत गुन्हेगार यांनी पुण्यात मोठ्या प्रमाणात उपद्रव निर्माण केला होता. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम असणारे आयपीएस अधिकारी अमितेशकुमार यांनी पुण्यात २ वर्षांमध्ये उत्तम कामगिरी करत गुन्हेगारीचा उपद्रव लक्षणीयरित्या कमी केला. रस्त्यावरच्या कोयता गॅंग पासून संघटीत गुन्हेगारी पर्यंत तसेच वाहतूक सुधारणे पासून अवैध धंद्यांना चाप लावण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या साऱ्या प्रकारात शिस्तीचा बडगा उगारुन खात्याअंतर्गत साफसफाई केली. त्यामुळे एकाच ‘मलईदार’ पोस्टवर वर्षानुवर्षे ठिय्या मांडून असणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली.

🔴’न खाऊंगा, ना खाने दूंगा’ कार्यपध्दती🔴

पुण्यात आता एकेकाळी मुंबईत जसे गुन्हेगारीचे साम्राज्य होते,तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर अमितेशकुमार यांच्या सारख्या प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे २ वर्ष २ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अमितेशकुमार यांच्याकडे आणखी काही काळ शहराची सुत्रे असावीत असा एक मतप्रवाह आहे.‌ तर राजकीय लागेबांधे असणाऱ्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांना अमितेशकुमार यांच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’अशा कार्यपध्दतीविषयी सुप्त नाराजी आहे.

आपापल्या हद्दीत वसुलेबाजी करुन दरमहा भरपूर पैसा कमावण्याचे तंत्र काही पोलीस अधिकारी अवलंबतात. त्यामध्ये जुगार, मटक्याच्या धंद्यांकडे, गांजा, चरस किंवा मॅफेड्राॅन सारख्या अंमली पदार्थांच्या अड्ड्यांकडे किंवा बेकायदेशीर दारुच्या धंद्यांकडे दुर्लक्ष करणे, स्पा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायांना नकळत अभय देणे, गुन्हेगारांवर कारवाई करताना पैसे घेऊन कारवाईचे स्वरूप सौम्य करणे, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार आणि हाॅटेल्स यांना मोकळे रान देणे अशा अनेक गैरप्रकारांचा समावेश आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी (प्रथम माहिती अहवाल एफआयआर) आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे (एआय) नोंंदवून घेतल्या जाणे, एकाच पोलीस स्टेशनमधील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाचवेळी बदली करण्याचे आदेश जारी करणे, शहर पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, या वर्षाच्या सुरुवातीला शहरातील २७ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश देणे, काही अधिकाऱ्यांचा ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने, तर काहींचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या बदल्या करणे आदींमधून त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वाहतूक सुधारणेसाठी पीटीपी ऍप किंवा नशा मुक्त तरुणाई अभियान या व अशा उपक्रमांना नागरिकांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे.

प्रशासकीय बदल्या अनेकदा प्रस्थापित धोरणांनुसारच केल्या जात असल्या, तरी जेव्हा त्या नियोजित वेळेपूर्वीच केल्या जातात, तेव्हा त्याकडे अनेकदा एक प्रकारची “शिक्षा” म्हणूनच पाहिले जाते. अमितेश कुमार पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या कामकाजावर नेहमी लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी ते त्यांच्या कामाचा आढावा घेत असतात. एवढेच नाही, तर त्यांच्याकडे आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीवरून देखील ते पोलीस निरीक्षकांच्या कामकाजाचे मूल्यमापन करतात.

बदल्यांबाबत अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कर्तव्यात कसूर केली, तर प्रभारी अधिकाऱ्याची कोणत्याही प्रकारची भिडभाड न ठेवता ते त्यांची उचलबांगडी करतात. कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते गुन्हे निरीक्षक करतात, तर कधी गुन्हे निरीक्षकांना ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कामाची संधी देतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात बदली प्रक्रिया हा अधिकाऱ्यांसाठी नेहमीच धास्तीचाच विषय राहिलेला आहे.

एखाद्या प्रामाणिक आणि कडक पोलीस अधिकाऱ्याची बदली करवली जाण्यामागे प्रामुख्याने राजकीय दबाव, भ्रष्ट व्यवस्थेशी होणारा संघर्ष किंवा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे त्यांचे प्रयत्न ही कारणे असतात. जेव्हा एखादा अधिकारी आपले कर्तव्य निपक्षपातीपणे पार पाडतो, तेव्हा नकळतपणे का होईना, पण त्यामुळे काही प्रभावशाली व्यक्तींच्या हितसंबंधांना बाधा पोहोचते; आणि मग अशा व्यक्ती आपल्या प्रभावाचा वापर करून त्या अधिकाऱ्याच्या बदलीचे सूत्रे हलवतात.

राजकारणी किंवा प्रभावशाली व्यक्तींनी
आपल्याविरुद्ध उचललेल्या कठोर पावलांचा  बदला घेण्यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांच्या बदलीचे कारस्थान रचल्याची उदाहरणे आहेत. तशीच परिस्थिती अमितेशकुमार यांच्याबाबतही आहे.

जेव्हा प्रामाणिक अधिकारी बेकायदेशीर कृत्यांना आळा घालतात, तेव्हा या कारवाईमुळे बाधित झालेले गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके त्या अधिकाऱ्याची बदली घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. जे अधिकारी गुन्हेगारांशी हातमिळवणी करण्यास ठामपणे नकार देतात, त्यांचा अनेकदा संघर्ष निर्माण होतो.गुन्हेगारांशी संगनमत न करणारे अधिकारी, पोलिसांना आपल्या हातातील बाहुल्यांप्रमाणे वापरू पाहणाऱ्या आणि त्यांच्यावर नियंत्रण गाजवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी डोकेदुखी ठरतात.

जेव्हा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होते, तेव्हा स्थानिक जनता आणि प्रसारमाध्यमे अनेकदा त्यास विरोध दर्शवतात; कारण अशा अधिकाऱ्याच्या रूपाने आपल्याला सुरक्षिततेचा आधार आणि न्यायाची हमी मिळाली होती, अशी भावना त्यांच्या मनात असते. तशीच परिस्थिती अमितेशकुमार यांच्या बाबत निर्माण होत होऊ शकते.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांशी नुकताच संवाद साधला. हा उपक्रम यापुढील काळात नियमित राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. नगरसेवकांशी संवाद हा उपक्रम स्तुत्य असून, त्या माध्यमातून पोलिसांना शहरातील वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, तसेच विविध समस्यांबाबतची माहिती मिळणे शक्य होणार आहे. नगसेवकांच्या सूचना आणि तक्रारी पोलिसांनी विचारात घेतल्यास शहर अधिक सुरक्षित होण्यास मदत होऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे शक्य होणार आहे.

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतलेले अमितेश कुमार कायदा आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमितेश कुमार १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अमितेश कुमार हे नागपूर आणि मुंबईचे पोलिस उपायुक्त, सोलापूर आणि औरंगाबाद (ग्रामीण) पोलिस अधीक्षक, अमरावतीचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त (एटीएस), आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र) म्हणून काम केले आहे.

नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून सर्वाधिक काळकाम करण्याचा विक्रम अमितेशकुमार यांनी केला आहे. साल २००७ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा क्रिकेट सामना सुरु असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहीमचा हस्तक मनोज कोचर यांच्या संभाषण रेकॉर्ड करून क्रिकेट जगात खळबळ माजविली होती. या कामगिरीमुळे अमितेश यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.

अमितेश कुमार यांनी छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते

त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपती पदक बहाल झाले आहे. बिहारमधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या पुण्यातील कारकीर्दीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यांनी नागरी अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी दिवसरात्र झटत सहकाऱ्यांना सक्रिय राहण्याची प्रेरणा दिली आहे.

चौकट 👇 👇 👇 👇 👇 👇 फोटोसह

बदली ऐवजी पाठराखण हवी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या कारभार सांभाळत असताना राज्यात शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील, कायद्याचे राज्य कसे निर्माण होईल याकडे कटाक्ष दिला आहे. पुण्यात गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा घालणाऱ्या अमितेशकुमार यांच्या बदलीची कुणकुण सुरू झाली आहे. मात्र अनेक वर्षांनी आंदेकर टोळी सारख्यांची दहशत मोडून काढण्यासाठी हिंमत दाखवणाऱ्या अमितेशकुमार यांची बदली होऊ नये, अशी लोकभावना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली पाहिजे.

चौकट 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

बदलीच्या चर्चांना पूर्णविराम

मध्यंतरी लोकसभा निवडणुकांपूर्वी अमितेशकुमार यांची बदली होणार अशी चर्चा होती. त्यामागे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मधील सुप्त कुरबुरी आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विषयी जाहिरपणे काहीदा नाराजी व्यक्त करत पोलीस दलाला सुविधा देत असूनही गुन्हेगारी कमी का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, पवार यांच्या अकस्मात अपघाती निधनानंतर बदलीची चर्चा सध्या शमली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page