लाचेच्या सापळ्यात जप्त केलेल्या नोटा उंदरांनी खाल्ल्या!

नवी दिल्ली : पोलिसांच्या पुरावा जतन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाचेच्या सापळ्यात जप्त केलेल्या नोटा उंदरांनी खाल्ल्याचा दावा पोलिसांनी नुकताच केला. त्यावर देशातील सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. शिक्षेविरुद्धचे अपील सुनावणीसाठी आले तेव्हा न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती देत आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
बिहार मध्ये अरुणा कुमारी(बाल विकास प्रकल्प अधिकारी) या महिलेला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. विशेष न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केली. अपील अर्जामध्ये पाटणा उच्च न्यायालयाने निर्णय उलटवत अरुणा कुमारीला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सापळ्याच्या वेळी जप्त नोटा उंदरांनी खाल्ल्या असे विशेष न्यायालयास पोलिसांनी सांगितले होते.
जप्त चलनी नोटा उंदरांनी नष्ट केल्या या दाव्याने दोन्ही न्यायमूर्ती आश्चर्यचकित झाले. नोटा नष्ट झाल्याबाबत दिलेले स्पष्टीकरण विश्वासार्ह वाटत नाही. अशा प्रकारच्या घटना किती प्रमाणात घडतात आणि जप्त माल सुरक्षित ठेवण्याची पोलिसांची यंत्रणा कितपत सक्षम आहे याचा अभ्यास आवश्यक आहे. अशी घटना राज्याच्या महसुलालाही मोठा फटका देणारी ठरू शकते, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.



