कायदा-सुव्यवस्थेचा धज्जा! ‘पॅसेंजर’ भरण्याच्या वादातून पुण्यात जीवघेणा हल्ला; पुलावरून खाली पडल्याने तरुण थोडक्यात वाचला!

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं दिवसाढवळ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सूरज माणिक काळे असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून तो पेशाने रिक्षाचालक आहे. सूरजवर आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून भररस्त्यात कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
‘पॅसेंजर’ भरण्याच्या जुन्या वादातून जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला कोणत्याही गुन्हेगारी वैमनस्यातून झालेला नाही, तर व्यावसायिक वादातून झाला आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी रिक्षात ‘पॅसेंजर भरण्यावरून’ सूरज काळे आणि आरोपींमध्ये मोठा वाद झाला होता. हाच जुना राग मनात ठेवून सोमवारी तिन्ही आरोपींनी सूरजला पुलावर गाठले आणि त्याच्यावर थेट कोयत्याने हल्ला चढवला.
आरोपी जेव्हा सूरजवर कोयत्याने सपासप वार करत होते, तेव्हा स्वतःचा बचाव करत असताना सूरज पुलावरून थेट खाली कोसळला. सुदैवाने पुलावरून खाली पडल्यामुळेच त्याचा जीव वाचला, कारण त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले.
या घटनेनंतर आंबेगाव पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अवघ्या काही तासांतच तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बापूसाहेब बाळासाहेब भोसले (वय ३५ वर्षे), गणेश हरिभाऊ धारपाले (वय २७ वर्षे), गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय ३६ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुण्यात कायद्याचा धाक उरला नाही का?
भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर कोयत्याने वार करण्याच्या या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पुण्यात वारंवार घडणाऱ्या कोयता हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासन अशा गुंडांवर कधी आणि कशी कडक कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



