पुणे शहर

बड्या रुग्णालयाची मुजोरी की डॉक्टरांचा हलगर्जीपणा? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या प्रियांशीचा मृत्यू; ससूनने मृत्यूचे कारण ठेवले ‘राखीव’, पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार!

हसत-खेळत गेलेली चिमुरडी परतलीच नाही; आधी आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, आता वैद्यकीय अहवालाच्या नावाखाली पोलिसांची टाळाटाळ. ‘महाराष्ट्र मिशन’चा थेट सवाल – गरिबांच्या जीवाचे मोल काय?

विशेष प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील नामांकित आणि बड्या समजल्या जाणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोळ्याच्या तिरळेपणावर (Squint) साधी शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या प्रियांशी जितेंद्र बागडे या ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. शस्त्रक्रियेपूर्वी सर्व वैद्यकीय अहवाल (Reports) अगदी ‘नॉर्मल’ असतानाही, ऑपरेशन थिएटरमध्ये नक्की काय घडले, याबाबत रुग्णालय प्रशासनाने संशयास्पद गुप्तता पाळली आहे.

हसत-खेळत गेलेली चिमुरडी आयसीयूमध्ये कशी पोहोचली?

मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरचे असलेले बागडे कुटुंब आपल्या ६ वर्षांच्या मुलीच्या डोळ्याचा त्रास दूर करण्यासाठी मोठ्या आशेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आले होते. रुग्णालयाने सर्व चाचण्या करून ‘मुलगी फिट आहे’ असे सांगत शस्त्रक्रियेची तारीख दिली. काल ठरल्याप्रमाणे आईने आपल्या पोटच्या गोळ्याला हसत-मुखाने ऑपरेशन थिएटरच्या दारापर्यंत सोडले. मात्र, काहीच वेळात संपूर्ण चित्र पालटले.

ऑपरेशन थिएटरमध्ये मुलीच्या डोळ्यात ड्रॉप सोडल्यानंतर तिला अचानक रक्ताची उलटी झाल्याचे समजते. या अत्यंत गंभीर परिस्थितीची कोणतीही पूर्वकल्पना पालकांना न देता, रुग्णालयाने तिला तडकाफडकी आयसीयू (ICU) मध्ये हलवले. पालकांनी विचारणा केली असता, “तबीयत अचानक बिघडली असून आम्ही सीपीआर (CPR) देत आहोत,” असे त्रोटक उत्तर डॉक्टरांनी दिले. काही वेळातच त्या चिमुरडीचा श्वास थांबल्याचे घोषित करण्यात आले.

प्रकरण दडपण्याचा आणि ‘आर्थिक आमिषा’चा खळबळजनक आरोप

चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार बाहेर येऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने नेहमीप्रमाणे आपली यंत्रणा कामाला लावली. मृत मुलीच्या हतबल आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून, तसेच दबाव आणून हे प्रकरण इथेच दडपण्याचा (Settlement) प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे.

मात्र, जेव्हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला, तेव्हा ससून प्रशासनाने “पोलीस तक्रारीशिवाय (NOC) आम्ही शवविच्छेदन करणार नाही” अशी करारी भूमिका घेतली. ससूनच्या या पवित्र्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे मनसुबे उधळले गेले आणि हे प्रकरण अधिकृतपणे पोलिसांपर्यंत पोहोचले.

ससूनचा ‘राखीव’ अहवाल आणि पोलिसांचा ‘नवा पवित्रा’

या प्रकरणात ससून रुग्णालयात शवविच्छेदन तर झाले, पण तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण ‘राखीव’ (Cause of death reserved) ठेवले आहे. आता व्हिसरा तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

दुसरीकडे, कायद्याचे रक्षक असलेल्या अलंकार पोलिसांनी नेहमीप्रमाणे बड्या हस्तीला वाचवणारा पवित्रा घेतला आहे. “शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आणि वैद्यकीय समितीचा अभिप्राय आल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही,” असे सांगत पोलिसांनी केवळ ‘अकस्मात मृत्यू’ (ADR) ची नोंद केली आहे. त्यामुळे, ‘एवढ्या मोठ्या दवाखान्याविरुद्ध पोलीस सहजासहजी गुन्हा कसा दाखल करतील?’ हा सामान्य जनतेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

तनिषा भिसे प्रकरणाची पुनरावृत्ती?

अखेर प्रश्न दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आहे!

यह तेच रुग्णालय आहे, जिथे काही महिन्यांपूर्वी तनिषा भिसे या गरोदर महिलेचा आणि तिच्या बाळाचा करुण अंत झाला होता. त्यावेळीही संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. परंतु, नंतर अत्यंत हुशारीने संपूर्ण दोष तनिषा भिसे यांच्यावरच कसा होता, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला होता. आज प्रियांशी बागडे या ६ वर्षांच्या मुलीच्या बाबतीतही नेमकी तीच ‘स्क्रिप्ट’ वापरली जात असल्याचे चित्र आहे.

यंत्रणेला ‘महाराष्ट्र मिशन’चे रोकडे सवाल

१. रिपोर्ट्स नॉर्मल तर मृत्यू कसा?

शस्त्रक्रियेपूर्वी मुलीचे सर्व रिपोर्ट १००% नॉर्मल होते, तर मग भूल (Anesthesia) देताना किंवा शस्त्रक्रिया करताना अशी कोणती चूक झाली ज्यामुळे ६ वर्षांच्या मुलीला रक्ताची उलटी झाली आणि तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला?

२. पारदर्शकता का नाही?

मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तात्काळ पालकांना आत का बोलावले गेले नाही? त्यांच्यापासून सत्य का लपवले गेले?

३. कारवाईसाठी दिरंगाई का?

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा आडोसा घेऊन पोलीस प्रत्येक वेळी बड्या डॉक्टरांना आणि कॉर्पोरेट रुग्णालयांना पाठीशी का घालतात? एका निष्पाप मुलीचा जीव गेल्यानंतरही तत्परतेने चौकशी का सुरू होत नाही?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारख्या मोठ्या संस्थांमध्ये उपचाराच्या नावाखाली सामान्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का, अशी शंका घेण्यास वाव आहे. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर गरिबांचे आवाज दाबले जाऊ शकतात, पण ‘महाराष्ट्र मिशन’ या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही. प्रियांशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page