पुणे शहर

पोलिसांची ‘नजरचूक’ प्रतिष्ठित व्यक्तीस भोवली; नाहक एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात रवानगी 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात ज्या गुन्ह्याशी लवांडे यांचा कोणताही संबंध नव्हता, तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवल्याचे पोलिसांनी अखेर मान्य केले. न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये ही सर्व प्रक्रिया केवळ नजरचुकीने घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस आयुक्त या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

या प्रकारानंतर पोलिसांची ही खरोखरच नजरचूक होती की एका राजकीय प्रवक्त्याला चुकीच्या माहितीच्या आधारे अडकवण्याचा हा प्रयत्न होता, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. विकास लवांडे यांना पोलिसांनी केलेली अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

लवांडे यांच्यावर ८ मे रोजी वाघोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान पोलिसांनी लवांडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा केला होता. २०१७ मध्ये बिबवेवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, तपासात असे समोर आले की, २०१७ मध्ये लवांडे यांच्यावर नथुराम गोडसेच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, जो शासनाने २०२२ मध्येच मागे घेतला आहे.

पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर भलताच गुन्हा दाखवला, जो गौतम कांबळे नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीवर दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी दाखल होता. धक्कादायक म्हणजे, त्या गुन्ह्यातून संबंधित आरोपीची निर्दोष मुक्तताही झाली. आहे. या दरम्यान लवांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी सुरू असल्याचा आरोप केला होता.

लवांडे म्हणतात की माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.

दरम्यान, वारकरी सांप्रदायच्या अवमानप्रकरणी अटक केलेल्या लवांडे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. त्याला बचाव पक्षातर्फे वकील मिलिंद पवार यांनी विरोध केला. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांना तत्काळ जामीन द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने लवांडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

पवार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर या अर्जावर तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांना म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या अर्जावर सोमवारी (दि. २५) सुनावणी होणार आहे, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात पवार यांनी शपथपत्र दाखल केले असून, पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page