मुंबई

वरळीतील नाल्यामध्ये उतरून सफाईची प्रत्यक्ष पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखरेख   

मुंबई : मुंबई शहरातील मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा माजी आमदार मिलिंद उर्फ अण्णा कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडगे तसेच प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी नाल्यामध्ये उतरून केली.

यावेळी संबंधित भागातील नाला सफाईची सद्यस्थिती, गाळ काढण्याची प्रक्रिया, जलनिस्सारण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कांबळे यांनी भूमिका मांडताना सांगितले की, मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ निविदा, फाईल आणि कागदोपत्री आकडेवारीपुरता मर्यादित राहू नये. प्रत्यक्षात नाले पूर्ण क्षमतेने साफ झाले आहेत का, याचे उत्तर प्रशासनाने नागरिकांना द्यायला हवे. प्रत्येक वर्षी मान्सूनपूर्व कामांवर मोठा खर्च होतो, मात्र पावसाळ्यात पुन्हा पाणी साचण्याच्या घटना दिसतात. त्यामुळे केवळ अहवाल नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम दिसणे आवश्यक आहे.

सोहेल सुभेदार यांनी सांगितले की, मुंबईकरांना आश्वासनांचा पाऊस नको, तर प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था हवी आहे. नागरिकांना दरवर्षी त्याच समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारणे गरजेचे आहे.

ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले की, नाला सफाईची कामे केवळ कंत्राटी प्रक्रिया पूर्ण करण्यापुरती न राहता प्रत्यक्ष परिणामकारक असावीत. मान्सून काळात नागरिकांच्या जीवितास आणि दैनंदिन जीवनाला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी कामांची गुणवत्ता तपासली जाणे आवश्यक आहे.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे आवश्यक सूचना व नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदनही मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page