हडपसर विषारी दारू प्रकरण: निष्काळजीपणा भोवला; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन अधिकारी निलंबित!

पुणे (विशेष प्रतिनिधी) : हडपसर परिसरात गावठी व विषारी दारू प्राशन केल्यामुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यू प्रकरणाची पुणे पोलीस प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आपल्या कर्तव्यात कसुरी करणे, बेकायदेशीर दारू विक्रीकडे दुर्लक्ष करणे आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पुणे पोलीस दलासह अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
१) संजय मोगले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे), हसीना शिकलगार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी – हडपसर पोलीस चौकी) आणि हसन मुलाणी (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक – DB) असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
१२ नागरिकांचा मृत्यू, दोन्ही आयुक्तालयांत खळबळ
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि लगतच्या भागात विषारी दारू पिल्याने नागरिकांची प्रकृती खालावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ जणांचा मृत्यू झाला असून, हडपसर परिसरामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माहिती असूनही प्रभावी कारवाई करण्यात अपयश
पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या निलंबन आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांच्या हद्दीत बेकायदेशीररित्या गावठी व घातक दारूची विक्री केली जात होती. स्थानिक पोलीस चौकी आणि गुन्हे शोध पथकाला (Detection Branch) याची पुरेशी माहिती असणे आवश्यक होते. मात्र, या अवैध धंद्यांवर वेळेत आणि प्रभावी कारवाई करण्यात हे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले. अधिकाऱ्यांच्या याच निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असून, यामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेला आणि प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
गुन्हे शाखेकडून तपास सुरू, कडक कारवाईचा इशारा
या दुर्घटनेनंतर हडपसर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांन्वये ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेची विशेष पथके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दारूमध्ये घातक रसायन मिसळणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. “कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कारवाईद्वारे दिला आहे.
…ही तर थेट ‘हत्याच’, आरोपींवर कडक कलमे लावा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या भीषण दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दखल घेतली असून ते थेट ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ही घटना अत्यंत गंभीर असून, हा प्रकार एक प्रकारे ‘हत्याच’ आहे. माझे दोन्ही पोलीस आयुक्तांशी सविस्तर बोलणे झाले असून पोलिसांनी या विषारी दारू निर्मितीचा मुख्य अड्डा शोधून काढला आहे. प्राथमिक तपासानुसार यामध्ये ‘मिथेनॉल’सारख्या घातक रसायनाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यामागील संपूर्ण ‘इकोसिस्टम’ आणि पुरवठा साखळी (Supply Chain) उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली असून, याच्या मागे असणाऱ्या इतर मुख्य सूत्रधारांचाही शोध सुरू आहे. दोषींवर अतिशय कडक कलमांन्वये कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही.”



