सिंघम आयुक्त तुकाराम मुंढेंचा राज्याला दणका! गुटखा, भेसळयुक्त अन्न आणि भ्रामक औषध माफियांची कोंडी; कोट्यवधींचा साठा जप्त, ३२ जण जेरबंद!

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन मुंबई/पुणे : राज्यात ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) विभाग म्हटलं की, केवळ दिवाळीत खव्यावर कारवाई करणारा आणि वर्षभर सुस्त बसणारा विभाग अशीच आजवरची ओळख होती. मात्र, तडफदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच या सुस्तावलेल्या विभागाला अक्षरशः ‘नवसंजीवनी’ मिळाली आहे. आयुक्त मुंढेंच्या थेट निर्देशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि भ्रामक औषध माफियांविरोधात एकाच वेळी वादळी मोहीम सुरू झाली आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांत प्रशासनाने राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा धडक कारवायांचा धडाका लावत माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
मोहीम १: गुटखा आणि पानमसाला माफियांना ‘मुंढे’ दाखवला इंगा; ३२ जण गजाआड!
३० व ३१ मे या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेत तब्बल ३२ आरोपींना अटक करण्यात आली असून २६ आस्थापने सील ठोकण्यात आली आहेत. या कारवाई दरम्यान एकूण १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियमभंग करणाऱ्यांवर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) आणि ‘अन्न सुरक्षा मानके कायद्या’च्या कडक कलमांखाली थेट एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत.
,मोहीम २: आंबे, गुळ आणि अन्नपदार्थांमधील भेसळ चव्हाट्यावर; ९७ लाखांचा साठा जप्त!
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांमध्ये (मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इ.) मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. यामध्ये संशयीत/असुरक्षित आणि अस्वच्छ पद्धतीने बनवलेला तब्बल ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तीन ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे पकडले. तिथे सुमारे १०,६६,२४२ रुपये किमतीची १५,०९६ किलो साखर आणि गुळ जप्त करण्यात आला. नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) मार्केटमध्ये कृत्रीमरित्या आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे व संशयीत द्रवाचा घातक वापर करताना आढळल्याने तीन ठिकाणी मिळून सुमारे ११ लाख १२ हजार ८५० रुपये किंमतीचे आंबे जप्त करण्यात आले.
मोहीम ३: भ्रामक जाहिराती आणि अवैध औषधांवर एल्गार; ‘दिव्या फार्मसी’ला मोठा दणका!
औषध माफिया आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध एफडीएने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. ‘औषधे व जादूटोणाविरोधी कायदा १९५४’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तराखंडमधील प्रसिद्ध ‘मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार’ या उत्पादकासह अन्य आस्थापनांवर छापे टाकून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा आक्षेपार्ह व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करण्यात आला आहे.
डिजिटल पाऊल: तक्रारदारांची माहिती राहणार गुप्त; लवकरच येत आहे मोबाईल ॲप!
नागरिकांना अवैध औषधे, गुटखा विक्री किंवा अन्नपदार्थांतील संशयास्पद भेसळीबाबत तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी एफडीआयेतर्फे लवकरच एक नवीन मोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक सुरू केला जात आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव आणि पत्ता पूर्णपणे गोपनीय ठेवला जाईल.
औषध साठा जप्तीचा विभागनिहाय आकडा
◾पुणे विभाग: २ एलोपॅथी मिसब्रँडेड औषधांसह एकूण ३६ लाख ५२ हजार ४०९ रुपयांचा साठा जप्त (यात दिव्या फार्मसीच्या १४.६८ लाखांच्या साठ्याचा समावेश).
◾कोकण विभाग: मे. दिव्या फार्मसीच्या औषधांचा १८ लाख ५८ हजार रुपयांचा साठा जप्त.
◾नागपूर विभाग: ७ लाख २६ हजार ७५५ रुपयांचा साठा जप्त.
◾नाशिक विभाग: ७ लाख १० हजार ९४५ रुपयांचा साठा जप्त.
◾बृहन्मुंबई विभाग: १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त.
◾अमरावती विभाग: १ लाख ४२ हजार २२९ रुपयांचा साठा जप्त.
◾छत्रपती संभाजीनगर: ४८ हजार ७१८ रुपयांचा औषध साठा जप्त.
विभागांनुसार झालेल्या कारवाईचा धडाका
◾कोकण विभाग: सर्वाधिक धडक कारवाई! १६ आस्थापनांवर कडक कारवाई करत १६ जणांना बेड्या ठोकल्या.
◾छत्रपती संभाजीनगर: ११ ठिकाणी धाडी टाकून ७ आरोपींना अटक.
◾पुणे: ३ ठिकाणी कारवाई, २ जणांना अटक.
◾अमरावती: ३ ठिकाणी कारवाई, ३ जणांना अटक.
◾नाशिक: २ ठिकाणी कारवाई, २ जणांना अटक.
बृहन्मुंबई: १ ठिकाणी कारवाई, २ जणांना अटक.◾

