लातूर

शेतकरी बापाच्या कष्टाचे ‘सार्थक’; संगारेड्डीवाडीच्या लेकाने उंचावला मराठवाड्याचा मान

निलंगा : “स्वप्न पाहणे ही पहिली पायरी असते, पण ती स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी लागणारी जिद्द आणि सातत्य असेल, तर यश नक्कीच मिळते,” हे सार्थक सतीश हाडोळे याने सिद्ध करून दाखवले आहे. लातूर जिल्ह्यात असलेल्या निलंगा तालुक्यातील सावरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या

आणि अवघ्या चारशे ते साडेचारशे लोकसंख्या असलेल्या ‘संगारेड्डीवाडी’ या छोट्याशा खेडेगावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने आपल्या कर्तृत्वाने भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे.

 मुळापासून सुरू झालेला यशाचा प्रवास 

सार्थकचे प्राथमिक शिक्षण संगारेड्डीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. गावातील शाळेत शिकत असतानाच त्याने मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने साताऱ्यातील प्रतिष्ठित सैनिकी शाळेत प्रवेश मिळवला. तिथून त्याचा लष्करी शिक्षणाचा पाया अधिक भक्कम झाला. त्यानंतर, नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), पुणे येथे कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने स्थान मिळवले आणि अखेर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मधून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून तो देशाचा रक्षक बनला.

कष्टाचा आणि संस्कारांचा वारसा: हाडोळे कुटुंबाचा त्याग 

सार्थकच्या या यशाचे खरे वाटेकरी त्याचे वडील सतीश हाडोळे, आई पल्लवी हाडोळे आणि आजोबा शेषेराव हाडोळे हे आहेत. केवळ दीड एकर शेतीची जुमलबंदी करत, निसर्गाच्या लहरीपणाशी लढा देत मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी अहोरात्र कष्ट उपसले. तर, आई पल्लवी हाडोळे यांनी सार्थकवर केलेले संस्कार आणि त्याला प्रत्येक वळणावर दिलेले प्रोत्साहन त्याच्या जडणघडणीत मोलाचे ठरले आहे. विशेष म्हणजे, आजोबा शेषेराव हाडोळे यांचे खंबीर मार्गदर्शन आणि त्यांनी कुटुंबात जोपासलेली शिस्त यामुळेच सार्थक आज भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून अभिमानाने उभा आहे. गरिबीच्या चटक्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी या कुटुंबाने सोसलेली धडपड आज सार्थकच्या लेफ्टनंट पदाच्या नियुक्तीने खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आहे.

 मराठवाड्याच्या ग्रामीण भागासाठी नवा आदर्श 

डेहराडून येथे पार पडलेल्या भव्य ‘पासिंग आऊट परेड’मध्ये सार्थकला अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. सध्या तो मणिपूर येथे आपल्या कर्तव्यदक्षतेने देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या यशामुळे संगारेड्डीवाडीसह संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागातील तरुणांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. “ध्येय गाठण्यासाठी संसाधनांची नाही, तर तीव्र इच्छाशक्तीची गरज असते,” हेच सार्थकने आपल्या प्रवासातून सिद्ध केले आहे.

लेकाची गगनभरारी: लेफ्टनंट सार्थक हाडोळे यांचे ‘महाराष्ट्र मिशन’चे संपादक नरसिंग कांबळे यांच्याकडून अभिनंदन”

“संगारेड्डीवाडीसारख्या अवघ्या ४००-४५० लोकवस्तीच्या छोट्याशा गावातील शेतकरीपुत्र सार्थक हाडोळे याने भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली, ही बातमी अत्यंत अभिमानास्पद आहे. सार्थकचे यश समजताच मी त्याच्या वडिलांशी सतीशभाऊंशी आणि आजोबा शेषेराव काकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला; तेव्हा त्यांच्या आवाजातील तो सात्विक अभिमान शब्दांत मांडणे कठीण आहे. त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने ‘सार्थक’ झाल्याची भावना मनात दाटून आली.

माझ्या गावातील युवाशक्तीला माझे एकच आवाहन आहे की, गरिबी कधीच स्वप्नांच्या आड येत नाही. जर जिद्द असेल, तर दुर्गम खेड्यातूनही हिरे चमकू शकतात. सार्थक हाडोळेला आदर्श मानून गावातील प्रत्येक तरुण-तरुणीने मोठी स्वप्ने पहावीत. तुमच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन’ सदैव तुमच्या पाठीशी आहे. मणिपूरच्या सीमेवर देशसेवा करणाऱ्या सार्थकचे यश हे केवळ त्याचे नसून, ते आमच्या मराठवाड्याच्या मातीचा गौरव आहे. तू खऱ्या अर्थाने आमच्या तरुणांसाठी ‘रोल मॉडेल’ आहेस!”

— नरसिंग कांबळे

संपादक, महाराष्ट्र मिशन

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page