लातूर: प्रशासनाचा ‘बश्या’ बैल ठरला मदतीपेक्षा अडचण; बळीराजाची पुन्हा कोंडी

देवणी (लातूर): लातूर जिल्ह्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांनी आपल्या पत्नीला नांगराच्या जुवाला जुंपल्याची हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, प्रशासनाने दिलेला हा ‘मदतीचा बैल’ आता ‘बश्या’ (काम न करणारा) निघाला असून, यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत भरच पडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वळवाच्या पावसात वीज पडून दगावला होता. हातातील भांडवल गेल्याने नांगरणीसाठी बैल नसल्याने त्यांनी स्वतःच्या पत्नीला औताला जुंपले. या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. या घटनेची तातडीने दखल घेत १० जून रोजी प्रशासनाने गायकवाड यांना मदतीचा एक बैल दिला. मात्र, दोनच दिवसांत हा बैल शेतातील मशागतीदरम्यान कामाला जुंपला असता मान काढून घेऊ लागला आणि जागच्या जागी बसून राहिला. हा बैल गोशाळेतील असल्याने त्याला शेतीकामाचा कोणताही अनुभव नसल्याचे समोर आले आहे.
प्रशासनाच्या घाईमुळे फजिती
मदत करताना जनावराची आरोग्य तपासणी किंवा ते कामासाठी सक्षम आहे का, याची साधी खातरजमा प्रशासनाने केली नाही, अशी चर्चा आता देवणी तालुक्यात सुरू आहे. “प्रशासन सजग असल्याचे दाखवण्यासाठी केवळ घाईत निर्णय घेतले,” अशी टीका आता नागरिक करत आहेत.
पुढील मदतीची प्रतीक्षा
दरम्यान, प्रशासनाने रोख ३२ हजार रुपयांचा धनादेश बटईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास दिला आणि बैल खरेदीसाठी ५० हजार रुपयांची स्वतंत्र मदतही मंजूर केली. परंतु, ही रक्कम मिळाल्यानंतरही मंगळवारच्या जनावरांच्या बाजारात न पोहोचल्याने गायकवाड यांच्याकडे अजूनही कामाचा बैल उपलब्ध नाही. आता पुढच्या मंगळवारी बाजार गाठून स्वतः पसंतीचा बैल खरेदी करण्यासाठी त्यांना मदत देण्यात आली आहे.
एकीकडे पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला असून, मदतीच्या नावाने झालेल्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची मशागत रखडली आहे. आता पुढील बाजारात त्यांना खरोखरचा ‘कामाचा बैल’ मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



