मुंबई हादरली! मुलं पळवण्याच्या संशयातून ४ साधूंना जमावाने झोडपले, जोगेश्वरी येथील घटना

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी साधूच्या वेशातील चार जणांना घेरून बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरीतील दुर्गा नगर भागात हा सर्व प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या ४ दिवसांपासून संशयास्पद हालचाली
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही जण साधूच्या वेशात गेल्या चार दिवसांपासून अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात अत्यंत संशयास्पद रितीने फिरत होते. त्यांच्या हालचालींवरून हे लोक मुले पळवण्याच्या किंवा चोरीच्या उद्देशाने रेकी करत असावेत, असा संशय स्थानिक नागरिकांना आला. हा संशय संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखा पसरला.
जमावाने घेरले आणि थेट कायदा हातात घेतला
दुर्गा नगर परिसरात या चारही जणांना पाहताच संतप्त नागरिकांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने नागरिकांचा राग अनावर झाला. शेकडो नागरिकांच्या जमावाने या चारही साधूंना घेरले आणि त्यांना रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. परिसरात मोठा गदारोळ निर्माण झाल्यानंतर काहींनी मध्यस्थी करत या चौघांना जमावाच्या तावडीतून सोडवले.
पोलिसांच्या स्वाधीन; चौकशी सुरू
नागरिकांनी या चारही संशयित व्यक्तींना बेदम चोप दिल्यानंतर थेट जोगेश्वरी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस आता या चारही व्यक्तींची कसून चौकशी करत असून, ते खरच साधू आहेत की साधूच्या वेशातील भामटे? तसेच ते या भागात का फिरत होते, याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.



