कोल्हापूर

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या हालचालींवर मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला दिला थेट इशारा

कोल्हापूर : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेचे कौतुक करत, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या बदलीच्या शक्यतेवर सरकारला कडक इशारा दिला आहे. रविवारी कळंब मार्गे कोल्हापूरला जात असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे अनेक गैरप्रकार उजेडात येत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले. मात्र, याच प्रामाणिक कार्यामुळे मुंढे यांच्या बदलीसाठी राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सरकारला सावध केले आहे. “मुंढे साहेब अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची राजकीय दबावापोटी बदली करण्याचा प्रयत्न झाला, तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची मागणी

यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केले. सरकारकडे केवळ कर्जमाफी नको, तर संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तसेच, आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असल्याने आपण त्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. ही भेट पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी असून, त्याला कोणताही राजकीय संदर्भ देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page