आधी मोदींची पदवी दाखवा…”; अभिजित दीपके यांचे केंद्र सरकारला खुले आव्हान

नवी दिल्ली : सरकारविरोधात बोलल्यास किंवा प्रश्न विचारल्यास केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) मागे लावली जात असल्याचा गंभीर आरोप ‘कॉक्रोज जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. माझ्याकडे ईडी पाठवत असाल तर पंतप्रधानांची पदवीही सोबत पाठवा, मी माझी पदवी, शिष्यवृत्ती आणि कर्जाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यास तयार आहे, मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्रीही सार्वजनिक करण्यात यावी, असे खुले आव्हान दीपके यांनी केंद्र सरकारला दिले आहे. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बुधवारी (ता. ५) होणाऱ्या सीजेपीच्या प्रवक्ते आणि कोअर टीमच्या बैठकीपूर्वी ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दीपके यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करत विविध राजकीय मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
सार्वजनिक पदावरील व्यक्तींची पात्रता समोर आली पाहिजे
सार्वजनिक पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती मिळण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे प्रतिपादन दीपके यांनी केले. दरम्यान, गुजरातमधील एका आरटीआय कार्यकर्त्याने अभिजित दीपके यांच्या वडिलांच्या पगाराबाबत आणि शिक्षणाच्या खर्चाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर दीपके चांगलेच आक्रमक झाले. माझ्या वडिलांचा पगार विचारता, मग आधी मोदींची डिग्रीही दाखवा, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा
झारखंडमध्ये सध्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपला संवाद झाल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी आंदोलनातून मागे हटूस नये, कॉक्रोज जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आवाहन दीपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना केले.
पारंपरिक राजकारणावर ताशेरे व आगामी रणनीती
मतदान एका पक्षाला केले जाते, मात्र नंतर सरकार मात्र दुसऱ्याच पक्षाचे स्थापन होते, यामुळे पारंपरिक राजकारणाबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ नवीन पक्ष स्थापन करून प्रश्न सुटणार नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाऊन मोठे आंदोलन करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सीजेपीच्या देशव्यापी विस्ताराचा आराखडा, मजबूत संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय रणनीती निश्चित केली जाणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.



