पुणे शहर

महिला व बालविकास क्षेत्राचा ‘आधारस्तंभ’ सेवानिवृत्त:

सुधीर साळवी यांचा ३७ वर्षांचा गौरवशाली सेवाप्रवास संपन्न!

पुणे : महिला व बालविकास विभागातील एक अत्यंत संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सुधीर साळवी यांनी नुकताच आपल्या ३७ वर्षे आणि ६ महिन्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कार्यकाळाचा निरोप घेतला. आपल्या कार्यकाळात त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्याच पार पाडल्या नाहीत, तर हजारो गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला.

शून्यातून विश्व उभे करणारा जिद्दी प्रवास

२४ जून १९६८ रोजी जेजुरीच्या पायथ्याशी असलेल्या पांडेश्वर या छोट्या गावात जन्मलेल्या साळवी यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, गरिबीशी झुंज देत त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवली. बी.कॉम, एम.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना त्यांनी कधीही हार मानली नाही. १९८९ मध्ये महिला व बालविकास विभागात प्रमुख लिपिक म्हणून रूजू झालेल्या साळवी सरांनी आपल्या कार्यतत्परतेच्या जोरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (वर्ग १) अशा महत्त्वाच्या पदांपर्यंत मजल मारली.

कामासोबतच माणुसकीचे जतन

केवळ सरकारी कर्मचारी म्हणून नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. महिला सक्षमीकरण, बालहक्क संरक्षण आणि समाजात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. १९९४ चा रेल्वे अपघात असो वा २०१६ मधील ड्युटीवरील दुखापत, वैयक्तिक संकटांना न घाबरता त्यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिले. “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…” या विंदा करंदीकर यांच्या ओळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला तंतोतंत लागू होतात. त्यांच्या या प्रवासात त्यांना सहकारी, मित्र आणि विशेषतः त्यांच्या पत्नी सौ. सविता साळवी यांचे भक्कम पाठबळ लाभले.

सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा अंत नव्हे

सेवानिवृत्तीच्या सोहळ्यात बोलताना अनेक सहकाऱ्यांनी  सुधीर साळवी यांच्या निस्वार्थी मदतीचे किस्से सांगितले. मदतीसाठी धावून जाणारा त्यांचा स्वभाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज जरी ते शासकीय सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग समाजाला यापुढेही मिळत राहील, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला.

कविता चौरे (संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग) यांनी सरांच्या या गौरवशाली प्रवासाचे वर्णन करताना, त्यांचे व्यक्तिमत्व हे कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता यांचा संगम असल्याचे म्हटले आहे. साळवी साहेबांचे पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानी जावो, अशा शुभेच्छा संपूर्ण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page