महाराष्ट्र

‘अमृत भारत’मध्ये कोट्यवधींची रोकड; RPF च्या कारवाईने नाशिकमध्ये खळबळ!

नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत मोठी कारवाई करत एका तरुणाकडून तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त केली. संदीप बाळासाहेब भामरे असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा आटपाडी, जिल्हा सांगली येथील रहिवासी आहे. सध्या तो जळगावमधील भवानी पेठ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. याचदरम्यान गुरुवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर RPF जवानांना अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ट्रेन क्रमांक २२११२ मधून प्रवास करणारा हा तरुण बॅग घेऊन जात असताना जवानांनी त्याला थांबवून बॅगेची तपासणी केली.

तपासणीदरम्यान बॅगेत ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड आढळली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने RPF जवानांनी तरुणाकडे तिच्या स्रोताबाबत आणि वाहतुकीच्या कारणाबाबत विचारणा केली. मात्र, रोकडच्या स्रोताबाबत समाधानकारक स्पष्टीकरण आणि वैध कागदपत्रे सादर करण्यात त्याला अपयश आल्याचे समोर आले.

रोकडची एवढी मोठी रक्कम आढळल्यानंतर तिच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने RPF ने तातडीने नाशिकच्या आयकर विभागाच्या अन्वेषण युनिट-१ च्या उपसंचालकांना याबाबत कळवले. त्यानंतर जप्त करण्यात आलेली संपूर्ण रोकड आणि संदीप भामरे याला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आता या रकमेचा स्रोत, तिची मालकी आणि ती कोणत्या कारणासाठी व कुठे नेली जात होती, याबाबत आयकर विभागाकडून पुढील तपास केला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना झालेल्या या मोठ्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page