राष्ट्रीय

‘नव्या विश्वाच्या निर्मिती’चा संकल्प; हैदराबादमध्ये दुसऱ्या भारत शिखर परिषदेचा प्रारंभ

७० देशांतील एक हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी; सलमान खुर्शीद यांचे पहिल्या सत्रात विचारमंथन

हैदराबाद : तेलंगणा सरकारच्या आयोजनातून हैदराबाद येथे दुसऱ्या ‘भारत शिखर परिषद २०२६’ला शुक्रवारपासून सुरुवात झाली. ‘नव्या विश्वाची निर्मिती’ ही या दोन दिवसीय परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. हैदराबाद आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र आणि हायटेक्स प्रदर्शन संकुलात आयोजित या परिषदेत भारतासह सुमारे ७० देशांतील एक हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

परिषदेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या मुख्य सत्रात माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी आपले विचार मांडले. बदलती जागतिक राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध, लोकशाही मूल्ये आणि जागतिक सहकार्याची गरज या विषयांवर परिषदेत विचारमंथन होत आहे.

जागतिक राजकीय व्यवस्था, भू-राजकीय घडामोडी, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आर्थिक व सामाजिक न्याय, लैंगिक समानता, युवकांचा राजकारणातील सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणा अशा विषयांवर विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्य वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.

परिषदेत तेलंगणाच्या विकासाशी संबंधित स्वतंत्र सत्रांचाही समावेश आहे. शहरीकरण, आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, कल्याणकारी योजना, सहकारी संघराज्यवाद, संस्कृती, युवक आणि क्रीडा यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.

शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी समारोपाच्या सत्रात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सहभागी होणार आहेत. जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका आणि भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यावर या सत्रात विचार मांडले जाण्याची अपेक्षा आहे.

जागतिक स्तरावरील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर पर्यायी दृष्टिकोन मांडण्यासाठी आयोजित या परिषदेकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page