पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे परवाने निलंबित; एफडीएची कठोर कारवाई
स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि अन्नसाठवणुकीतील गंभीर त्रुटी; पार्सल व घरपोच सेवेलाही बंदी

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने निलंबित केले आहेत. दोन्ही आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. त्रुटींची पूर्तता करून एफडीएकडून लेखी परवानगी मिळेपर्यंत दोन्ही हॉटेलांना खाद्यपदार्थांची विक्री, पार्सल आणि घरपोच सेवा सुरू करता येणार नाही.
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत १३ नोव्हेंबर रोजी दोन्ही हॉटेलांची तपासणी करण्यात आली. वैशाली हॉटेलच्या तपासणीत स्वयंपाकघरातील जागेची कमतरता आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील निष्काळजीपणा समोर आला. कच्चा माल ठेवण्याचा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी, तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवण्यात आला होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवलेली आढळली. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य तयार पदार्थ उघड्या मार्गिकेत ठेवण्यात आले होते. कच्च्या चिरलेल्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवण्यात आल्याने अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता.
वैशाली हॉटेलला तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. त्यामुळे आस्थापनेची नोंद नियमांचे पालन न करणारी अशी करण्यात आली. स्वयंपाकघरात कीटकप्रतिबंधक दरवाजे, तापमान नियंत्रणाच्या नोंदी आणि पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अद्ययावत अहवालही उपलब्ध नव्हता. यापूर्वी जून २०२६ मध्ये तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्रुटी कायम राहिल्याने परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रूपाली रेस्टॉरंटच्या तपासणीतही स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याचे आढळले. त्यामुळे धूळ, घाण आणि कीटकांचा अन्नपदार्थांशी संपर्क येण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचणे, अपुरी स्वच्छता आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आढळले. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नव्हते. त्यावर आवश्यक लेबल आणि वापरण्याची अंतिम तारीखही नमूद नव्हती. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवण्याची व्यवस्था तसेच अन्नसुरक्षा व्यवस्थापन आराखडा आणि आवश्यक नोंदींचाही अभाव होता.
सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दोन्ही हॉटेलांनी सर्व गंभीर त्रुटी दूर केल्यानंतर एफडीएकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे. अन्नसुरक्षा मानकांची पूर्तता झाल्याची खात्री करून लेखी परवानगी मिळाल्यानंतरच त्यांना व्यवसाय सुरू करता येणार आहे.



