महाराष्ट्र

लासलगावमध्ये लाल कांद्याला ५,४०० रुपयांचा भाव; आठ दिवसांनंतर लिलाव पूर्ववत

नवीन लाल कांद्याला सरासरी ४,७०० रुपये; उन्हाळी कांद्यालाही चांगला दर

लासलगाव : दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे आठ दिवस बंद असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाले. लिलावाच्या पहिल्याच दिवशी नवीन लाल कांद्याला कमाल ५ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नवीन लाल कांद्याला किमान २ हजार ५०० रुपये, कमाल ५ हजार ४०० रुपये, तर सरासरी ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सुट्ट्यांनंतर बाजारपेठ सुरू होताच लाल कांद्याला मिळालेल्या या दरामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दुसरीकडे जुन्या उन्हाळी कांद्यालाही समाधानकारक दर मिळाला. या कांद्याला कमाल ४ हजार ३११ रुपये, किमान १ हजार ५०० रुपये, तर सरासरी ३ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे नवीन लाल कांद्याबरोबरच उन्हाळी कांद्यालाही बाजारात मागणी असल्याचे चित्र दिसून आले.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव ८ ते १२ नोव्हेंबरदरम्यान बंद होते. १३ नोव्हेंबरपासून लिलाव पुन्हा सुरू होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते. सुट्ट्यांनंतर पहिल्याच दिवशी मिळालेल्या दरांमुळे आगामी काळात कांद्याचे बाजारभाव कोणत्या दिशेने जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page