महाराष्ट्र

सत्तेवर ‘अच्छे दिन’, जनतेला महागाई; सुप्रिया सुळे आक्रमक!

मुंबई : सप्टेंबर उजाडताच बसलेल्या महागाईच्या नव्या फटक्यावरून आणि विविध वस्तूंच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. निवडणुका संपल्या की महागाई वाढवणे हीच सरकारची सवय झाली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला असून, इंधनावरील कर कमी करून जनतेला तातडीने दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच महागाईने होरपळून निघाले असताना, १ सप्टेंबरपासून विविध घटकांमधील दरवाढीमुळे जनतेवर आणखी एक प्रहार झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजीचे दर वाढून ते ८८ रुपयांवर पोहोचले आहेत, तर घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. तसेच, दूध, साखर, खाद्यतेल आणि गुळाच्या दरात झालेली वाढ ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तथाकथित ‘अच्छे दिन’चा नारा देणारे सरकार जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. इंधनावरील सेस आणि कर कमी करून महागाई तातडीने नियंत्रणात आणणे सरकारला शक्य आहे, मात्र त्यासाठी तशी इच्छाशक्ती हवी, असे सांगत सरकारने तात्काळ पावले उचलून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी आक्रमक भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page