धनादेश वटणार अवघ्या तासांत..बँकांमध्ये नवीन प्रणाली सुरू

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने आज ४ ऑक्टोबरपासून चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल केला. आता रकमेचे पेमेंट करण्यासाठी दिलेला धनादेश म्हणजे चेक आजपासून त्याच दिवशी, काही तासांतच वटणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या पेमेंट सेटलमेंट नेटवर्कमध्ये रिझर्व्ह बँकेने सुयोग्य बदल करून अद्ययावत केले आहे. त्यामुळे चेक क्लिअरन्ससाठी पूर्वीप्रमाणे २ ते ३ दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही. आता या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहक आणि बँकांचीही सोय होणार आहे. सरकारी बँकांतून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांसारख्या खासगी बँकांनीही चेक बँकेत भरल्यापासून काही तासांतच तो वटवण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती दिली. या नवीन प्रणालीअंतर्गत आजपासून जमा केलेले धनादेश त्याच दिवशी काही तासांत वटवले जाणार आहेत. धनादेश न वटता परत जाणे (बाउन्स होणे) टाळण्यासाठी खात्यात पुरेशी शिल्लक ठेवावी आणि विलंब किंवा नकार टाळण्यासाठी धनादेशाचे सर्व तपशील अचूक भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरबीआयने नव्या व्यवस्थेअंतर्गत कन्टिन्यूअस चेक क्लेरिंग मोड सिस्टिम सुरु केली. या अंतर्गत सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जितके चेक येतील, त्यांची इमेज आणि डेटा तात्काळ स्कॅन करुन क्लियरिंग हाऊसला पाठवला जाईल. त्या अंतर्गत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेक कन्फर्म करावा लागेल. बँकेने वेळेत उत्तर दिले नाही, तर चेक ऑटोमॅटिक क्लियर मानला जाईल.
ही नवीन व्यवस्था सुरुवातीला दिल्ली, मुंबई, चेन्नई या मोठ्या शहरात क्लियरिंग ग्रिडवर लागू होईल. नंतर देशभरात हा नियम लागू केला जाईल. यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. चेक वठण्याचा अनुभव अजून चांगला होईल. आरबीआयने मोठ्या अमाउंटच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम अनिवार्य केली आहे. यात ग्राहक बँकांना चेकचे महत्वपूर्ण विवरण आधीच सांगून ठेवतात. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होणार आहे. चुकीचे चेक ऑटोमॅटिक क्लियर होणार नाहीत. या परिवर्तनाचा ग्राहक आणि व्यवसाय दोघांना फायदा होणार आहे. यातून बँकिंग प्रणालीत कार्यकुशलता आणि विश्वसनीयता वाढेल, असे सांगण्यात आले.
चेक क्लिअरिंगचा नियम २ टप्प्यांत लागू
चेक क्लिअरिंगचा नियम २ टप्प्यांत लागू होणार आहे. यात पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ पर्यंत बँकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेकची पुष्टी करण्याचा वेळ असेल. दुस-या टप्प्यात ३ जानेवारी २०२६ पासून बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी केवळ ३ तासांचा वेळ मिळेल. सकाळी १० वाजता चेक जमा केला तर दुपारी २ वाजेपर्यंत तो चेक क्लियर करावा लागेल. त्यामुळे चेक क्लियरन्स अजून वेगवान होईल.



