विशेष संपादकीय लेख : बोकाळलेली भुरटी पत्रकारिता आणि पत्रकारितेतला प्रामाणिकपणा
पत्रकार दिन विशेष लेख

६ जानेवारी १८३२ रोजी मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र राज्यात मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जात आहे. योगायोग म्हणजे त्यापूर्वी ३ जानेवारी ला ‘महाराष्ट्र मिशन’ या लोकप्रिय साप्ताहिकाच्या स्थापनेला १ वर्ष पूर्ण होत आहे. पोलीस दलाची चांगली कामगिरी वाचकांपुढे आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन’ जोमदार काम करत आहे.
२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पत्रकार दिनानिमित्त आजच्या पत्रकारितेचे स्वरूप कसे आहे, पोलीस पत्रकार यांचे संबंध कसे असतात याचा मागोवा घेतला पाहिजे. पोलीस आणि पत्रकार यांचे नाते काही खास नसते. दोघांनीही आपापल्या गरजेनुसार एकमेकांशी संबंध ठेवणे आवश्यक असते. कारण जर पोलीस एखाद्या गुन्हेगाराला अटक करत असतील किंवा अशा कोणत्याही गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी काम करत असतील तर त्यांना प्रसिद्धीसाठी पत्रकारांची गरज असते. त्याच प्रमाणे पत्रकारांचे पोलीस ठाण्यांशी, संबंधित पोलिसांशी चांगले संबंध असल्यास त्यांच्या कष्टदायक कामगिरीची बातमी देणे आवश्यक असते. दोन्ही घटक एकमेकांना पूरक असतात. दोघांमध्येही कायमचे चांगले संबंध असू शकत नाहीत हेही खरे आहे.
चाकू, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापती करणे, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, दरोडा, हत्यार बाळगणे, बलात्कार, यासारखे गंभीर गुन्हे करणारे आणि लोकांमध्ये प्रचंड दहशत माजवणारे गुन्हेगार पळून जातात. खरे तर ते सुध्दा भित्रेच असतात, पण एखादा धाडसी म्होरक्या २/४ जणांची टोळी बनवून त्या त्या परिसरात दहशतवाद माजवतो. लोक घाबरत आहेत असे पाहून त्याला आणखी साथीदार येऊन मिळतात. टोळी आणि दहशत वाढत जाते.
अशा वेळी पोलीस जी भूमिका घेतात ती महत्त्वाची असते. पळून जाऊन दूरवर आपली ओळख पटणार नाही अशा प्रकारे लपून बसलेल्या क्रूर गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलीस दिवसरात्र जीवाचे रान करत राहतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आणि खबऱ्यांचा त्यांना आधार घ्यावा लागतो. त्यासाठी किती तास घालवावे लागतात, किती कष्ट करावे लागतात याचा काही हिशेब नसतो. समजा पोलीस रस्त्यावर किंवा पोलीस ठाण्यात नसतील तर काय होईल? भर दिवसा लूटमार होईल, बलात्कार होतील. दंगल होईल. पोलीस कसेही असोत ते आहेत म्हणून लोक सुखरूप आहेत. आयाबहिणींची इज्जत सुरक्षित आहे.
अशा पोलिसांना, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना नाहक त्रास देणारे भुरटे पत्रकार आजकाल बोकाळले आहेत. लोकशाहीचा चौथा म्हणून ज्या पत्रकारिता क्षेत्राकडे मोठ्या आशेने पाहिले जाते त्या पत्रकारितेत भुरट्या, बोगस पत्रकारांचा भरणा होत आहे. बोगस पत्रकारांमुळे शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात आहे किंवा ज्यांना पत्रकारितेच्या नावाखाली धमकवले जात आहे.
दुचाकी, चारचाकी गाडीवर ‘प्रेस’ लिहून परिसरात कधी न दिसणाऱ्या पेपरचे ओळखपत्र खिशात ठेऊन अधिकाऱ्यांना दम देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी व स्वतःचे अवैध व्यवसाय लपवण्यासाठी या ओळखपत्रांचा वापर होताना दिसत आहे.
काही तोतया पत्रकार खंडणी वसूल करण्याचे काम देखील करत असल्याची चर्चा आहे. यात कधीही प्रसिद्ध न होणाऱ्या, केवळ खंडणी वसूल करण्यासाठी सुरु केलेल्या अनियतकालिक चालकांचा यात समावेश आहे.
काही तोतया प्रेसचे कार्ड दाखवून असल्याचे भासवून गुटखा, जर्दा, दारू, याची तस्करी करताना देखील दिसतात. तर काही बोगस पत्रकार अवैध धंदेवाईकांकडून नोटा, ओली पार्टी खात राहतात. एखाद्या पेपरचे आयकार्ड दाखवून शासकीय कार्यालय व व्यावसायिकांकडे जाऊन पत्रकार असल्याचा रुबाब मारताना दिसतात. पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषि कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग, आश्रम शाळा, बँक व इतर कार्यालयात जाऊन पत्रकार असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न होतो.
अशा बोगस कार्डधारी पत्रकारांमध्ये बहुतांश रॉकेल दुकानदार, कंट्रोल डीलर, किराना दुकानदार, पानटपरीवाले, अवैध वाहतूक करणारे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
अशा बोगस पत्रकारांपासून पीडित अधिकारी, कर्मचारी इत्यादींनी बोगस पत्रकार व त्यांचे कारनामे याविषयीची तक्रार पोलिसांमध्ये करून खंडणीबहादर आणि तोतया पत्रकारांवर आळा घालायला हवा. पोलिसांनी देखील असे खंडणीखोर पत्रकार शोधून त्यांच्यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. प्रेस इन्फाॅर्मेशन ब्यूरो सारख्या संस्था किंवा प्रादेशिक स्तरावर काम करणाऱ्या पत्रकार संघटनांनी खरे आणि खोटे ओळखण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर भंपक पत्रकार शिरजोर होण्याशिवाय राहणार नाहीत.
पत्रकारितेत प्रामाणिकपणा हा प्रामाणिक माणसांमधून येतो. पण आजच्या काळात प्रामाणिक पत्रकारिता बघायची असेल तर माणसाला मत्सर, द्वेष, लोभ, द्वेष या दुष्कृत्यांचा त्याग करावा लागेल. कारण आज चॅनेल्समध्ये पुढे जाण्याची स्पर्धा लागली आहे आणि ईर्षेमुळे बातम्यांचा स्तर खाली गेला आहे. बातमी पूर्ण सत्यासह दाखवली जात नाही. काही वेळा बातम्यांमध्ये आणखी चुकीच्या गोष्टी मिसळल्या जातात ज्यामुळे खरी बातमी मिळूच शकत नाही.
पत्रकारिता करणारी माणसे तेव्हाच पत्रकारिता प्रामाणिकपणे चालवू शकतात जेव्हा ते स्वतःतील दुष्कृत्यांचा त्याग करतील. परंतु, माझ्या मते आजच्या काळात हे अशक्य आहे. या दुष्कृत्यांना माणूस सोडणार नाही आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करू शकणार नाही. मग ते पोर्टल असो, चॅनल किंवा न्यूजपेपर…
– नरसिंग कांबळे, मुख्य संपादक, महाराष्ट्र मिशन



