छ. संभाजीनगर

समृद्धी महामार्गावर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’

विशेष प्रतिनिधी / संभाजीनगर :

रात्रंदिवस अतोनात मेहनत करूनही कांद्याला बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज समृद्धी महामार्गावर उतरून थेट न्याय्य हक्कासाठी एल्गार पुकारला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या थेट नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर हे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग दणाणून सोडला.

घोषणेबाजीत सरकारचा निषेध; मदत फक्त कागदावरच!

आंदोलनाचे नेतृत्व करताना आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. “सरकारच्या सर्व घोषणा हवेतच विरल्या असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात शून्य मदत पडली आहे. स्वतःच्या घामाच्या दामासाठी शेतकऱ्याला आज रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असे दानवे यावेळी म्हणाले. समृद्धी महामार्गावर उतरलेला प्रत्येक शेतकरी हा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून स्वतःच्या हक्काची लढाई लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना (UBT) आणि शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचा इशारा देत खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत :

 

⚫ १. ‘नाफेड’मार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करा: बाजारातील घसरण थांबवण्यासाठी शासकीय यंत्रणेने तात्काळ थेट खरेदी केंद्र सुरू करावीत.

⚫ २. ₹२००० हमीभाव आणि अनुदान: कांद्याला प्रति क्विंटल किमान २००० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे आणि सोबतीला शेतकऱ्यांना योग्य आर्थिक अनुदान देण्यात यावे.

शेतकऱ्यांचा संताप अनावर!

“आम्ही रात्रंदिवस शेतात राबून कांदा पिकवला, पण आज बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळत आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नाही. सरकारने आता तरी डोळे उघडावेत, नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने दिली.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची तीव्रता पाहता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेना (UBT) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजारो शेतकरी या आंदोलनात रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. जोपर्यंत मागण्यांवर ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page