महाराष्ट्र

सामान्यांना वीजदराचा आणखी एक जोरदार झटका; महावितरणकडून ‘इंधन समायोजन शुल्क’ लागू, ऑगस्टचे बिल येणार वाढीव!

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांना वीजदरवाढीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर वीजबिल कमी येईल, अशी सर्वसामान्य ग्राहकांची भलतीच आशा होती. मात्र, महावितरणने घेतलेल्या एका नव्या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महावितरणने जुलै महिन्यांच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge) लागू केल्यामुळे ग्राहकांच्या ऑगस्ट महिन्याच्या बिलाचा आकडा वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक, औद्योगिक आणि इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांनाही प्रत्येक युनिटमागे अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे.

शुल्कवाढीमागचे नेमके कारण काय?

चालू उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला काही प्रमाणात महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. हा अतिरिक्त वीजखरेदीचा खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) निर्देशानुसार हे इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

घरगुती ग्राहकांसाठी स्लॅबनुसार अतिरिक्त शुल्क:

घरगुती वीज वापराच्या श्रेणीनुसार ग्राहकांवर वेगवेगळ्या प्रमाणात हे शुल्क लागू असणार आहे:

◾दारिद्र्यरेषेखालील ग्राहक: १० पैसे प्रति युनिट

◾१०० युनिटपर्यंत वापर: २० पैसे प्रति युनिट

◾१०१ ते ३०० युनिट वापर: ४० पैसे प्रति युनिट

◾३०१ ते ५०० युनिट वापर: ५० पैसे प्रति युनिट

◾५०० युनिटपेक्षा अधिक वापर: ६० पैसे प्रति युनिट

 

व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रावरही परिणाम

इंधन समायोजन शुल्काचा हा बोजा केवळ घरगुती ग्राहकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. कमी दाबाच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी वापराच्या श्रेणीनुसार ४० ते ६० पैसे प्रति युनिट अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय, औद्योगिक ग्राहकांनाही याचा फटका बसणार असून, कमी दाबाच्या उद्योगांसाठी प्रति युनिट २५ ते ३५ पैसे, तर उच्चदाबाच्या उद्योगांसाठी श्रेणीनुसार ३० ते ४५ पैसे अतिरिक्त आकारले जातील.

दुसरीकडे, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट १५ ते २५ पैसे इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारकडून उचलला जात असल्याने या अतिरिक्त शुल्काचा प्रत्यक्ष आर्थिक परिणाम थेट सरकारच्या तिजोरीवर होणार आहे.

ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर

गेल्या एप्रिल महिन्यात नवीन वीजदर लागू करताना ग्राहकांना दिलासा मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता ऐन पावसाळ्यात लागू झालेल्या या इंधन समायोजन शुल्कामुळे प्रत्यक्ष वीजबिलात भरमसाठ अतिरिक्त रक्कम जोडली जाणार आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page