राष्ट्रीय

जम्मू-कश्मीरच्या बारामूला जिल्ह्यात सुरक्षा दलांना यश; संयुक्त कारवाईत एक दहशतवादी शस्त्रसाठ्याह जेरबंद!

श्रीनगर / बारामूला : जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यात सुरक्षा दलांना एक मोठे यश मिळाले आहे. शनिवारी जिल्ह्यातील शेरी परिसरातील फथागढ भागात भारतीय लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अत्यंत महत्त्वाची संयुक्त मोहीम भारतीय लष्कराच्या ४६ राष्ट्रीय रायफल्स (RR), बारामूला पोलीस आणि सीआरपीएफच्या ५३ व्या बटालियनने एकत्रितपणे राबवली. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी संबंधित परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवून व्यापक शोधमोहीम हाती घेतली होती. याच तपासणी मोहिमेदरम्यान एका संशयित दहशतवाद्याला घेराबंदी करून ताब्यात घेण्यात आले.

सुरक्षा यंत्रणांनी त्याच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला असला, तरी त्याची नेमकी ओळख आणि जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. हा दहशतवादी कोणत्या कुख्यात संघटनेचा आहे, तो कुठून आला होता, कोणत्या घातपाती कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता आणि त्याचे इतर काही धागेदोरे आहेत का, या सर्व बाजूंचा सखोल तपास सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.

कुलगाम मजुरांच्या हत्या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक आक्रमक

दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात एका दिवसापूर्वी दोन प्रवासी मजुरांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शनिवारी आपली शोधमोहीम आणखी तीव्र केली आहे. या दुर्घटनेनंतर सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि विरोधी पक्ष पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.

उपराज्यपालांची उच्चस्तरीय बैठक व कठोर निर्देश

या सर्व पार्श्वभूमीवर, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस प्रमुख आणि इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन जम्मू-कश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. दहशतवाद्यांविरोधातील कारवाया अधिक आक्रमक आणि तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी सुरक्षा दलांना दिले.

तसेच, राज्यातील सर्व प्रवासी मजुरांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतींचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश उपराज्यपालांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. दरम्यान, पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांच्यासह पोलीस व सुरक्षा दलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page