राष्ट्रीय

उत्तर प्रदेशच्या धडाडीच्या महिला आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा!

लखनऊ : उत्तर प्रदेश केडरच्या अतिशय धडाडीच्या आणि कर्तव्यकठोर महिला सनदी अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रशासकीय सेवेतील १३ वर्षांच्या प्रदीर्घ, यशस्वी आणि लक्षणीय प्रवासानंतर त्यांनी घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती सोशल मीडियावर एका अत्यंत भावनिक पोस्टद्वारे दिली असून, त्यांचे हे शब्द सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत.

उच्च शिक्षण, लंडनची नोकरी अन् युपीएससीत यश

२०१३ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या दिव्या मित्तल यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. त्यांनी देशातील नामांकित अशा आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरू येथून उच्च शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणानंतर त्यांना लंडनमध्ये लाखांचे पॅकेज असलेली आलिशान नोकरी मिळाली होती. मात्र, मातृभूमीची सेवा करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी परदेशातील ती मोठी नोकरी सोडली आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम करत त्यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश मिळवत सनदी सेवेत प्रवेश केला. २ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची पहिली नियुक्ती मेरठ येथे झाली होती. त्यानंतर गोंडा, कानपूर, बरेली, संत कबीर नगर आणि मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी (सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३) म्हणून त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली. जुलै २०२४ पासून त्या देवरियाच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या, तर मे महिन्यात लखनऊ येथे महसूल विभागाच्या विशेष सचिव म्हणून त्यांची शेवटची सरकारी नियुक्ती पार पडली.

“मी किती मूर्ख होते…”, दिव्या मित्तल यांची भावनिक पोस्ट

स्वेच्छेने राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना दिव्या मित्तल यांनी लिहिले की, “आज मी स्वतःच्या इच्छेने (आयएएस) अधिकारी म्हणून राजीनामा देत आहे. मी माझ्या १३ वर्षांच्या प्रवासातून पाऊल मागे घेतलं आहे. मी किती मूर्ख होते! जे विचार करायचे की मी या देशाला किंवा लोकांना काहीतरी द्यायला आले आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, या १३ वर्षांत मलाच लोकांकडून सर्वाधिक प्रेम, सन्मान आणि आपुलकी मिळाली. लोकांचे हे ऋण माझ्यावर आयुष्यभर राहील.” सरकारी सेवेतील अनुभव सांगताना त्यांनी एका फाईलमागचे महत्त्व मांडले. फाईल म्हणजे फक्त कागद नसून तो एखाद्या गरिबाचा अधिकार, शेतकऱ्याला शेतापर्यंत पाणी मिळण्याची मंजुरी किंवा मानवी जीवनाची आशा असते, असे त्यांनी म्हटले आहे.

एका वृद्ध आईचा स्पर्श आणि डोळ्यांत पाणी

आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना त्या भावूक झाल्या. त्यांनी लिहिलं की, “देवरियामध्ये मला शिकायला मिळालं की योग्य बाजूने उभं राहणं हा पर्याय नसून आपलं परम कर्तव्य आहे. आज ही सेवा सोडत असताना डोळ्यांत पाणी आहे. आजही माझ्यासमोर लहुरिया गावातल्या डोंगरात ती वृद्ध आई आहे, जिने पहिल्यांदा पाणी गावात पोहोचताना पाहिलं होतं. तिने थरथरत्या हाताने माझ्या डोक्याला हात लावून आशीर्वाद दिला होता. आज माझं पद सुटलं, पण तो स्पर्श मी बरोबर घेऊन चालले आहे.” दरम्यान, दिव्या मित्तल यांनी अचानक राजीनामा का दिला, याचे नेमके प्रशासकीय किंवा वैयक्तिक कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र त्यांच्या या एक्झिटने सर्वांनाच आचंबित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page