आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : न्या. संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आरक्षणाच्या मुद्यावरून सर्व माहिती दिली. कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. शेवटी याबाबत चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु आडमुठ्या भूमिकेमुळे तोडगा निघणार नाही. सरकार हे कायद्याने चालते. सरकार कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवेल. कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्या सगळ्यांचा वापर करून आपण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हैदराबाद गॅझेटसंदर्भात आम्ही न्या. संदीप शिंदे यांची समिती तयार केली आहे. मुदत देणे न देण्याचा इथे प्रश्न येत नाही. आपण तयार केलेल्या शिंदे समितीमुळे मराठा समाजातील कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या. यातून आपण सदर कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्रे दिली. आपण हैदराबाद गॅझेटचे काम या समितीकडे दिले आहे. त्याच संदीप शिंदे यांनी काल मनोज जरांगे यांना भेटून यात काही बदल करायचे आहेत. त्यासाठी वेळ लागेल, असे म्हटले. परंतु जरांगे यांनी इथे मुंबईतच आरक्षण द्या. परंतु त्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया आहेत, त्या पार न पाडता पुढील कार्यवाही करून कसे चालेल, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.



