
मुंबई/पुणे : प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक प्रभावीपणे थांबवून त्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि वाजवी दरात प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारने घोषणा केलेली अधिकृत ‘भारत टॅक्सी’ सेवा आता प्रत्यक्षात उतरली आहे. या सेवेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये करण्यात आली असून, यामुळे एकाच मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत.
सहकार चळवळीतून डिजिटल प्रवासाची दिशा
‘भारत टॅक्सी’ ही सेवा केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन यांनी संयुक्तपणे विकसित केली असून, यासाठी ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’ या संस्थेसोबत महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. खासगी कंपन्यांच्या व्यावसायिक नफेखोरीच्या तुलनेत ही सेवा पूर्णपणे सहकारी तत्त्वावर चालवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई विमानतळ परिसरात ‘भारत टॅक्सी’ सेवेचा भव्य शुभारंभ करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात तब्बल ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याची माहिती मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली आहे.
ॲपची वैशिष्ट्ये आणि परवडणारे दर
अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून ‘भारत टॅक्सी’ हे युजर-फ्रेंडली ॲप सहज डाऊनलोड करू शकतात. हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोयीचे ठरणार आहे. या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला पूर्णपणे परवडणारे आहेत. यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या १.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ ३१ रुपये भाडे आकारले जाणार असून, त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान अचानक वाढणाऱ्या ‘सर्ज प्राईसिंग’च्या त्रासापासून यामुळे प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.



