जरांगे यांच्या गर्दीकडे बघून विजयाचे आराखडे बांधण्याचे काम सुरु
उदय सामंतांची ठाकरेंच्या शिवेसनेवर टीका

मुंबई : मराठा समाजाचे सलग तिस-या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांच्याकडे जमलेली गर्दी पाहून काही लोक विजयाचे आडाखे बांधत आहेत, अशी टीका उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या उपसमितीच्याही जोर-बैठका सुरु आहेत. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेतील समितीही कामाला लागली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी संयम ठेवला पाहिजे. आज जे लोक त्यांना आपले वाटत आहेत, त्यांनी आरक्षण दिले का, हे देखील त्यांनी तपासले पाहिजे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनी दिले, त्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही साथ होती, असे सांगत मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.
केंद्र सरकारकडून घटनेमध्ये बदल करुन काही करायचा असेल तर ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार करतील. मात्र माझा विरोधकांना प्रश्न आहे की, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही, याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देताना, मराठा समाज त्यामध्ये बसणार आहे का? बसवावा का? याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे. सर्वजण राजकारण करत आहेत. मनोज जरांगे यांच्या गर्दीकडे बघून स्वत:च्या विजयाचे आराखडे तयार करत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल तर तसे स्पष्ट केले पाहिजे. नसेल द्यायचे तर नाही म्हणून पत्र काढले पाहिजे. दुटप्पी भूमिका का घेत आहेत, असा सवाल उदय सामंत यांनी विरोधकांना केला.



