गौतमी पाटीलला उचलणार की नाही?;चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन

मुंबई : नृत्यांगना गौतमी पाटील सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. तिच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षाचालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत सदर रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या गौतमी पाटीलच्या चालकाला काही तासांतच अटक करण्यात आली. दरम्यान अपघात झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण प्रसिद्ध करावे आणि गौतमी पाटीलला अटक करावी, या मागणीसाठी अपघातग्रस्त रिक्षाचालकाचे कुटुंबिय आणि शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने सिंहगड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान या आंदोलनानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले असता पाटील यांनी थेट पोलिस उपायुक्तांना फोन केला. फोन केल्यानंतर ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. अपघातग्रस्त कुटुंबाचा वैद्यकीय खर्च वाढला असून त्याबद्दल लवकर न्याय करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
गौतमी पाटीलविरोधात आंदोलन करणा-या ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी सांगितले की, गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत जरी नसली तरी तिची जबाबदारी संपत नाही. तिच्या नावावर गाडी असल्यामुळे ती सुद्धा आरोपीच आहे. तर रिक्षाचालकाच्या मुलीने सांगितले की, गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत होती की नाही? याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. आता सुरू असलेले प्रकरण प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी सीसीटीव्ही किंवा इतर पुरावे सादर केलेले नाहीत.
गौतमी पाटीलकडून आम्हाला संपर्क नाही.
अपघात झाल्यापासून आतापर्यंत गौतमी पाटीलच्या वतीने आमच्या कुटुंबाशी साधा संपर्कही केलेला नाही, असेही अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या मुलीने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.



