मराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

वीज कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर; ‘मेस्मा’ लागू करूनही कर्मचा-यांवर फरक नाही

मुंबई : खासगीकरण व पुनर्रचनेच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचा-यांच्या ७ संघटनांच्या बुधवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. जवळपास ६२ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्याचा महावितरणचा दावा असून या कर्मचा-यांच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपावर गेलेल्या कर्मचा-यांना अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार(मेस्मा) कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत.

वीज कर्मचा-यांच्या २९ पैकी ७ संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने आपत्कालीन नियोजन केले आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा संप बेकायदेशीर आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या ज्या कर्मचा-यांची सेवा एक वर्षापेक्षा कमी झाली आहे, ते संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा तात्काळ संपुष्टात येणार आहे. तसेच सुरवातीचे तीन वर्ष कंत्राटी म्हणून कार्यरत असणा-या कर्मचा-यांची सेवा, संपात सहभागी झाल्यास रद्द होणार आहे. सेवेमध्ये नियमित झालेले कर्मचारी सेवेत सहभागी झाल्यास त्यांच्या सेवेत खंड देण्याच्या कारवाईची तरतूद आहे असा इशारा महावितरणने दिला आहे.

आपत्कालिन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

महावितरणच्या दाव्यानुसार गुरूवारी सुमारे ६२ टक्के कर्मचा-यांची कामावर उपस्थिती होती. यासोबतच २० हजार तांत्रिक बा स्त्रोत कर्मचारी कार्यरत आहेत. संपकाळात प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणात आपत्कालिन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाद्वारे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व साधनसामग्रीने नियोजन करण्यात येत आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page