संपादकीय अग्रलेख

‘महाराष्ट्र मिशन’ अग्रलेख : आता भारत जोडो भाग २

विश्वगुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचं वलय, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा वाढलेला गलबला आणि भारतीय जनता पक्षाच्या कुरघोडीच्या राजकारणावर पडत चाललेली जनतेची आश्चर्याची नजर या बाबी देशाच्या इतिहासात लक्षात राहतील अशा आहेत. हिंदूत्ववादी लोकांना बरे दिवस असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संघ परिवारातल्या अनेक संघटना आणि कट्टर हिंदूत्ववादी चर्चेत येत आहेत. त्यात काही बाबा बुवा आणि साध्वी सुध्दा आक्रमकपणं पुढं येत आहेत. आंबा खाल्ला की मुलगा होतो हा समज प्रसारित करणारे गुरुजी सुध्दा त्यातच.

भारत जोडो यात्रा झाली तेव्हा मोदी विरुद्ध वातावरण तयार झालं होतं. आता भाजपची सुट्टी होणार असं वाटू लावलं गेलं. विधानसभा निवडणुकांनंतर लोक डोळे लावून बसले. मात्र राजस्थान सह काही राज्यं पुन्हा भाजपनं खेचून काॅंग्रेससह विरोधकांना धोबीपछाड दिली. त्यामुळं इंडिया आघाडीची अवस्था केविलवाणी झाली. इकडं महाराष्ट्रात सुध्दा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या बळावर भाजप विरोधी पक्षांना नामोहरम करतो आहे. दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टात जाऊन आपणच खरे हे सिध्द करु पाहत आहेत.

अशा भगव्या भगभगाटाच्या परिस्थितीत हिंमत न हारता भारत जोडो यात्रेपाठोपाठ आता भारत जोडो भाग २ म्हणून मणिपूर ते मुंबई न्याय यात्रेवर राहुल गांधी निघणार आहेत. ही प्रामुख्यानं चारचाकी यात्रा असली तरी, त्यात अधूनमधून पदयात्राही राहणार आहे. गेल्या पदयात्रेत अनेकांनी राहुल गांधींसोबत फोटो काढून घेतले. स्वतः ची छबी निर्माण केली.

चालणं हे मानवी शरीरासाठी फायदेशीर आहेच; पण माणसाच्या एकूणच व्यक्तिमत्त्वालाही लाभकारक ठरणारं असतं म्हणूनच, चालण्याचं महत्त्व नेहमी सांगितलं जातं. चालणाऱ्याचं भाग्य उजळतं, चरैवेति चरैवेति, केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, फायदा होतसे वगैरे उपदेश यातूनच आलेत. राहुल गांधींनी चालायला उशिरा सुरुवात केली. त्यांच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव आणि आई सोनिया गांधींनी काळाची पाऊलं ओळखून खूप आधी चालायला, लोकांत मिसळायला सुरुवात केली होती.

भारत जोडो यात्रेमुळेच कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांची सत्ता काँग्रेसला मिळू शकली, अशी भावना काँग्रेसमध्ये आहे. ती कितपत खरी, याबद्दल मतभेद आहेत. कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासारखा दणकेबाज नेता नसता तर हे यश मिळू शकलं असतं का, असा प्रश्न काही विरोधक विचारतात. ते राहुल गांधीच्या विरोधात आहेत. शिवकुमारांना श्रेय आहेच. पण त्यांचं खरं अस्तित्वच राहुल गांधींमुळेच असल्यानं मोठा कोण ठरतो, हे कन्नड जनता जाणते. म्हणून तर त्यांना डावलून सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनविण्यात आलं. शिवकुमारांना एका कोपऱ्यात गप्प बसवण्यात आलं.एकूण, कर्नाटकच्या यशाचं संपूर्ण श्रेय राहुल गांधींनी खेचलं आहे, हे तमाम कॉंग्रेसजनांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

तेलंगणाची स्थितीही अशीच आहे. आजचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामुळे काँग्रेस जिंकली, असं म्हणणारे लोक राहुल गांधींचे विरोधकच म्हटले पाहिजेत. कोण रेवंत रेड्डी ? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरुवात करून भारत राष्ट्र परिषद चळवळीतून काँग्रेसमध्ये आलेला माणूस काँग्रेसच्या विजयाचा सूत्रधार कसा काय असू शकतो हे लोकांना माहिती नाही का?

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम म्हणूनच हा विजय मिळाला, हेच सत्य आहे. तेलंगणाच्या यशाचे शिल्पकारही राहुल गांधीच. तेलंगणा राज्य स्वबळावर मिळविणारे के. चंद्रशेखर राव म्हणजे केसीआर याच नावानं प्रसिद्ध असलेले राव दहा वर्षात पूर्ण बिघडले, मनमानी कारभार करू लागले, घराणेशाही लादू लागले आणि त्यामुळे जनतेच्या मनातून उतरले वगैरे सर्व खोटं. राहुल गांधींशी टक्कर घेण्यात केसीआर कमी पडले, हेच खरं. हैदराबादच्या घराणेशहावर दिल्लीच्या घराणेशाहीचा वारस भारी पडला आहे.

आणि, तोच राजकुमार आता ईशान्येपासून पश्चिम भारतापर्यंत ६ हजारांवर कि. मी. वर्तुळात १४ राज्यांमध्ये पसरलेल्या पट्ट्यातही काँग्रेसला उभारी मिळवून देण्यासाठी पायपीट करणार आहे. त्यात त्यांना यश मिळो अशी कोट्यवधी भारतीय लोकांची इच्छा असू शकते.

यश म्हणजे काय असतं ? आजच्यापेक्षा स्थिती सुधारण. त्याअर्थानं कर्नाटक, तेलंगणा राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळालं, हे मान्य केलंच पाहिजे. मध्यप्रदेशात यश मिळू शकलं नाही. तर, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये ‘नकारात्मक यश’ मिळालं. या ६ हजार किलोमीटर पट्ट्यातील राज्यांमध्ये थोडंफारही यश मिळालं तर पुन्हा “राहुल गांधी जिंदाबाद” म्हणायला कॉंग्रेसजन मोकळे. कारण, ते यश नक्की राहुल गांधी असणार.

परंतु, या यशापेक्षाही मोठं यश मला वेगळंच दिसतं. ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळू शकतं. आज काँग्रेसची लोकसभेत काय स्थिती आहे ?२००४ ते २०१४ अशी सलग १० वर्षे देशावर राज्य करणारा हा पक्ष गेली साडेनऊ वर्षे लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष सुद्धा राहिलेला नाही.

कारण, २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये माजी सत्ताधाऱ्यांना एकपंचमांश, ५५ खासदार सुद्धा निवडून आणता आले नाही, एवढी त्यांची खस्ता हालत मतदारांनी केली. हे केवढं मोठं अपयश. यातून सावरून २०२४ मध्ये ५५ पेक्षा जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले आणि विरोधी पक्षनेतेपद जरी त्यांना मिळालं, तरी मोठं यश मिळालं असं म्हणता येईल. त्याचं सर्व श्रेय राहुल गांधींच्या ‘भारत न्याय यात्रे’ च्या पदरात टाकता येईल. एवढा तरी ‘न्याय’ मतदारांनी करावा, यासाठी पदयात्री राहुल गांधींना अनेक शुभेच्छा. अयोध्येच्या रामललाने देशाटनाचा असा लाभ त्यांना दिला ही मायाच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page