पुणे शहर

तथाकथित वादग्रस्त विधानावरून पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल 

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले. दगडफेकीनंतर पोलिसांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काॅंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या पुणे पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भाजपने रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागून दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कडक पावले उचलत घाटे आणि शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

रविवारी दुपारी भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस भवनाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव वाढला. या घोषणाबाजीचे रूपांतर बाचाबाचीत झाले. यानंतर काही क्षणातच दगडफेक सुरु झाली. या गोंधळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.

यानंतर पोलिसांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि इतर ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तर भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष गौरव बाळंदे, अक्षय जैन आणि सागर धाडवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा संशय आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला, त्याच समकक्ष कार्य टिपू सुलतान यांनी केले असून त्यांना महाराजांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे, असे वादग्रस्त विधान सपकाळ यांनी केले.

या विधानानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेला उत्तर देताना सपकाळ यांनी वर्धा येथे माध्यमांशी बोलताना भाजपला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका जुन्या विधानाचा दाखला देत भाजपला थेट सवाल विचारला. यामुळे आता हा वाद अधिकच चिघळत आहे.

झटापटीनंतर सपकाळ यांनी तातडीने दखल घेतली आहे. या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी सपकाळ यांनी अरविंद शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तसेच या राड्यात जखमी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचीही त्यांनी थेट फोन करून विचारपूस केली. जखमी कार्यकर्त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी घ्या. त्यांच्या दवाखान्याची, तपासण्यांची योग्य काळजी घ्या. कोणतीही कसर राहू देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page