संपादकीय अग्रलेख

अग्रलेख – पुणे; गुन्हेगारांचे माहेरघर

पुणे शहराला पेन्शनरांचे माहेरघर, शिक्षणाचे माहेरघर अशा अनेक उपाध्या होत्या. हळूहळू त्या मागे पडून आशिया खंडातील सर्वात विकसित होणारे शहर, कॉस्माॅपॉलिटन शहर, स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी अशी आधुनिक काळातील अनेक विशेषणे प्राप्त झाली. आता तर पुणे शहर हे गुन्हेगारीचे सुद्धा आगार बनलेले आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांत कधी नव्हे ते अल्पवयीन आढळून येत आहेत. तो प्रकार इतका वाढला आहे की त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सज्ञान होण्याचे वय १८ वरून १४ पर्यंत आणावे काय असा गंभीर विचार शासन करत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पुण्याला ‘कोयता गॅंग’ अशी वाईट ओळख मिळाल्याचे जाहीरपणे सांगितले होते. अर्थात त्यामागे महायुती सरकारच्या कारभार टीका करणे हाच हेतू होता. त्यांच्या पूर्वीच्या पक्षाच्या छत्रछायेखाली पुण्यातले कुप्रसिद्ध गुन्हेगार होते, अनेकांनी राजकारणात जाऊन संरक्षणाची ढाल मिळवून राजरोसपणे गुन्हे केले हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे कोणत्याही सरकारच्या काळात गुन्हेगारी थंड पडली होती का हा खरा प्रश्न आहे.

खरे तर पुणे आणि परिसरात लोकसंख्येचा कधीही नव्हता विस्फोट झाल्याचे दिसून येते आहे. जुन्या पुण्यातल्या ते कोथरूड धायरी सारख्या उपनगरांपर्यंत माणसांची प्रचंड गजबज झालेली आहे. सकाळी आणि संध्याकाळी मुंग्याचे वारूळ फुटल्यानंतर मुंग्या जशा सैरावैरा धावताना दिसतात तसे माणसांचे मोहोळ फुटले आहे. इथले अजूनही नैसर्गिक असलेले वातावरण आणि पाण्याची मुबलकता पाहून पुण्यात आलेले लोक लवकर पुणे सोडून बाहेर जात नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांची बदली जरी झाली तरी ते पुण्याच्या पन्नास किलोमीटरच्या परिसरामध्ये जमिनी घेऊन ठेवतात आणि त्यांच्या कुटुंबीयांना येथे स्थायिक करतात अशी अनेक वर्षांपासून परिस्थिती आहे.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये पुण्यात लोकसंख्या अफाट वाढत गेली. लगतच्या खेड्यांचे वेगाने नागरीकरण होत गेले. शेत जमिनीही अपुऱ्या पडल्या. उत्तरेला शिक्रापूर दौंड आणि पूर्वेला लोणी काळभोर, उरुळी कांचन पर्यंत तर पश्चिमेला तळेगाव, खडकवासल्या पर्यंत बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. सिमेंट काँक्रीटची जंगले पुण्याच्या संपूर्ण व्यासाला भिडली. आता तर शहराच्या ५० किलोमीटर त्रिज्येपर्यंत नागरीकिकरण पसरत गेले आहे. पुण्यात जमिनींना हिरे माणकांपेक्षाही मोलाचा भाव येऊन गुन्हेगारांनी आपला डोळा जमिनींकडे वळवला. पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे लँड माफिया तयार झाले. अनेक जण स्वतः बिल्डर बनले. गुन्हेगार, त्यांना पोसणारे राजकारणी, बिल्डर आणि सरकारी सेवेतून पदावरून निवृत्त झाल्यानंतर धनदांडग्या बिल्डरच्या पदरी पाणी भरणारे निवृत्त सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने पुण्याला आता झोपडपट्ट्यांसारखा बकालपणा आला.

मुंबईपेक्षा जास्त लोकसंख्या पुण्यामध्ये सामावली असल्याचे मध्यंतरी दिसून आले होते. एकट्या पुणे शहर लोकसभा मतदारसंघात मतदार संख्या नव्वद लाखापर्यंत जाऊन पोहोचली. याचा अर्थ अल्पवयीन मुले आणि बालके यांच्यासह पुणे शहराने लोकसंख्येचा सव्वा कोटीचा पल्ला केव्हाच पार पाडला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान सारख्या वेगवेगळ्या राज्यांमधून रोज येऊन पडणाऱ्या लोंढ्यांमध्ये भर पडते सोलापूर,सातारा, सांगली लातूर, परभणी, जळगाव यासारख्या जिल्ह्यांमधून जगण्यासाठी पुण्यात येणाऱ्या कुटुंबांची.

अशा या शहरांमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडणे साहजिक आहे. उन्हाळ्यामध्ये धरणे कोरडी पडू लागली की टँकरच्या फेऱ्या एकेकाळी पाण्यासाठी सधन असलेल्या भागातही सुरू होतात.

पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण या लोकसंख्येच्या वाढत्या रेट्यामुळे प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या तोकड्या संख्येमुळे आणि कायद्याची भितीच राहिली नसल्याने गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. भर दिवसा गर्दीच्या रस्त्यावर लुटालुट करण्यापासून निर्जन स्थळी असलेल्या जोडप्यांना लुबाडण्यापर्यंत गुन्हेगार सोकावले आहेत. गुन्हयांचे थैमान असलेल्या, कोणत्याही क्षणी मरण देणाऱ्या वाहतुकीचा राक्षस असलेल्या शहरामध्ये राहणे दिवसेंदिवस जोखीमीचे बनत चालले आहे.

परप्रांतीय २१ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेली असताना मोटरसायकल वरुन आलेल्या तिघांनी तिच्या मित्राला त्याच्याच कपड्यांनी बांधले. मारहाण देखील केली. त्यानंतर आळीपाळीने तिघांनी तरुणीवर बलात्कार केला. तिन्ही आरोपींकडे कोयता आणि बांबूच्या काट्या होत्या. त्यांनी तरुणीचे सर्व दागिने काढून घेतले तिच्यावर बलात्कार केला. कोणाला याबाबत सांगितले तर याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली. त्यानंतर ते त्या ठिकाणाहून पळून गेले. मोठ्या आशेने पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या या तरुणीच्या कुटुंबात, परिचितांना जो संदेश जाईल तो हे शहर मुलींसाठी सुरक्षित नाही असा असणार आहे. अशाच घटना होत राहिल्या तर लोकांनी घराबाहेर पडावे की नाही?

पोलीस सगळीकडेच असावेत अशी अपेक्षा कोणीही बाळगणार नाही मात्र पोलिसांनी आवश्यक कामे केलीच पाहिजेत. छोटे मोठे गुन्हे घडण्यापूर्वीच सावधगिरी मात्र बाळगली पाहिजे. असलेल्या मनुष्यबळाचा परिणामकारक वापर करून गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे आव्हान राजाच्या गृहमंत्र्यांपासून पुणे शहराच्या पोलिसांपर्यंत सर्वांनाच पेलले पाहिजे. गुन्हा होऊन गेला की पोलीस तेथे पोहोचणे आणि जिवीत, वित्त हानी होणे हे चित्र अनेक वर्षांपासून आहे. एकेकाळी पुण्यात पोलिसांचा जो दबदबा होता तो आज घडीला तीळ मात्र ही उरलेला नाही. त्यासाठी राज्य शासनाने सुद्धा तातडीने पावले उचलून सशस्त्र पोलिसांची गस्त वाढवण्यापासून पोलीस ठाण्यांची आणि पोलिसांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने आपापल्या हद्दीतील निर्जन, लूट होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन शासनाकडे अहवाल पाठवला पाहिजे. त्या ठिकाणी पोलिसांचे किमान अस्तित्व दिसेल याची खबरदारी घेतली पाहिजे. नागरिकांनीही अपरात्री निर्जन ठिकाणी जीव धोक्यात घालायचे टाळणे शहाणपणाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page