मुंबईसामाजिक

एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्यांनी वाढ

महसूल वाढीच्या उद्देशाने घेतला निर्णय

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने महसूल वाढीच्या उद्देशाने उन्हाळी सुट्टीत एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. एसटी महामंडळातर्फे उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
एसटीचा प्रवास महाग झाल्याने प्रवाशांना आता तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

आता प्रत्येक टप्प्यात प्रवाशांना १२ रुपये मोजावे लागतील. ही भाडेवाढ १५ एप्रिल २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, या कालावधीत साध्या बससाठी प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे.

यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह अखेर, गर्दीचा कालावधी यादरम्यान राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० टक्क्यापर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी (२०२६) साध्या बसच्या प्रवास भाडेदरास मंजुरी दिली आहे.

या भाडेवाढीतून मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासधारकांना वगळण्यात आले आहे. तसेच, काही विशेष योजना व सवलती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एसटीने सर्व आगार आणि विभागीय अधिकाऱ्यांना या भाडेवाढीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, ईटीएम आणि ओआरएस प्रणालीद्वारे सुधारित भाडे आकारणी केली जाणार आहे. ज्या मार्गावर निश्चित भाडे पद्धती लागू आहे. त्या ठिकाणीही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

साधी बस वगळता निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, विना वातानुकूलित शयनयान, शिवशाही (वातानुकूलित), जनशिवनेरी (वातानुकूलित), शिवनेरी (वातानुकूलित), ९ मीटर ई-बस (वातानुकूलित), १२ मीटर ई-बस/ई-शिवाई, या बससेवा प्रकारातील बस भाड्यात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे काही प्रवाशांनी मान्य केले आहे. तर सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा आर्थिक ताण वाढणार असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page