सामान्य जनता, शेतकरी उध्वस्त होत आहे सरकार मात्र मेलोडी वाटण्यात मश्गूल
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

नागपूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत आहे. देश अमेरिकेच्या दावणीला बांधला गेला आहे अमेरिकेच्या दबावामुळे भारताने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवली असून त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. कच्चं तेल स्वस्त झालंय,पण भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. गेल्या १० दिवसांत इंधन दरवाढ तब्बल ७.५ रुपयाने झालीये. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे केली.
कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याची टीका करत वडेट्टीवार म्हणाले की कापूस, कांदा, धान उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही.व्यापाऱ्यांना फायदा होत आहे पण शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी दुष्काळ येण्याचे संकेत आहे. महागाईमुळे सामान्य जनता आणि शेतकरी कसा सावरेल याकडे सरकारचे लक्ष नाही, ते मेलोडी वाटण्यात व्यस्त आहेत अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, काही नगरसेवकांना ५ लाख रुपयांचे टोकन देण्यात आले असून काहींचा भाव १५ लाखांपर्यंत गेला आहे.नगरसेवकांना कोट्यवधींची आमिषे दाखवून सत्ताधारी पक्ष निवडणुका पैशांच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्योगपती, कंत्राटदार आणि पैशांची ताकद आता लोकप्रतिनिधी ठरवणार असेल, तर भविष्यात लोकशाही जिवंत राहणार कशी? असा सवाल करत त्यांनी भाजप आणि सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीका केली. भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
काँग्रेसचा पक्षादेश मोडणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल आणि व्हीप जारी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असा इशाराही काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.



