महाराष्ट्रमुंबई

मराठी बोलता येत नाही? मग थेट लायसन्स रद्द होणार! रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा कायदा लागू

महाराष्ट्र मोटार वाहन नियमात मोठे बदल; अमराठी चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान बंधनकारक

मुंबई विशेष वृत्त : महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे पूर्वीपासून अनिवार्य आहे. मात्र, अनेक अमराठी चालक हा नियम डावलत असल्याने प्रवासी आणि चालकांमध्ये वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात आता व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा येणे अधिक कडकपणे बंधनकारक करण्यात आले असून, आजपासून हा नवीन सुधारित कायदा लागू करण्यात आला आहे.

काय आहेत नवीन कठोर तरतुदी?

नवीन नियमांनुसार, जर एखाद्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला व्यावसायिक व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे निदर्शनास आले, तर त्याला सर्वप्रथम एका महिन्याची नोटीस देण्यात येईल. दिलेल्या त्या एका महिन्याच्या कालावधीतही जर चालकाने मराठी भाषा शिकली नाही, तर त्याचे वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) सक्तीने ३ महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित (रद्द) केला जाईल. यानंतरही जर चालकाने मराठी शिकण्याबाबत टाळाटाळ केली, तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची कठोर तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे.

कायद्यातील व्याप्ती व सुधारणा

राज्य शासनाच्या शासकीय अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत जुन्या नियमांमध्ये विविध महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांनुसार रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या अ‍ॅप-आधारित (App-based) मोटार कॅब चालवणाऱ्या चालकांसाठी आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित सर्व परमिटधारकांसाठी ‘व्यावहारिक मराठी’च्या ज्ञानाची अट अत्यंत स्पष्टपणे लागू करण्यात आली आहे. अमराठी चालकांकडून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून प्रवाशांसोबत होणारे वाद आणि स्थानिकांच्या तक्रारी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page