नांदेड

नांदेडमध्ये घात: गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नदीत पोहण्याचा मोह दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना नांदेड शहरात घडली आहे. गोदावरी नदीच्या नगीनाघाट परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रणवीर शिंगाडे (वय १४ वर्षे) आणि गणेश डोंगरे (वय १३ वर्षे) अशी गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या दोन्ही बालकांची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उन्हाचा कडाका आणि सुट्ट्यांचे दिवस असल्याने रणवीर आणि गणेश हे दोघे आपल्या मित्रांसोबत नांदेड येथील गोदावरी नदीच्या नगीनाघाट परिसरात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीच्या पात्रात खोलवर रुतले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. सोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळातच दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र मिशन’चे आवाहन: उन्हाळ्याच्या दिवसांत नदी, तलाव किंवा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी जाताना लहान मुलांनी व पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा अंदाज नसताना नदी पात्रात उतरणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासनानेही सतर्कतेचे फलक लावणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page