मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही; जरांगे-पाटील यांचा मुंबई गाठण्याचा इशारा!

जालना/मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथून आजपासून उपोषणाला सुरुवात करत, आरक्षणासंबंधीच्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडक मारू, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
मुंबईकडे जाण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
मराठवाडा आणि गोदापट्ट्यापाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होत आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी एकाच वेळी न जाता टप्प्याटप्प्याने मुंबईत जावे, वाशी, पनवेल, कल्याण-भिवंडी किंवा ओळखीच्या पाहुण्यांकडे आणि मित्रांकडे आश्रय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच आझाद मैदानावर जमण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गांनी मुंबईत पोहोचण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पोलिसांशी संघर्ष न करता शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
१३ प्रमुख मागण्यांवर भर
या आंदोलनात प्रामुख्याने ५८ लाख कुणबी नोंदींवर प्रमाणपत्रे देणे, हैदराबाद गॅझेटिअरची प्रत्यक्ष अंमलबजावणी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना, ओबीसींच्या धर्तीवर सवलती लागू करणे, सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू करणे, आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत आणि बहुचर्चित ‘सगे-सोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी या प्रमुख १३ मागण्यांचा समावेश आहे.
सरकारकडून अद्याप आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे स्पष्ट करत जरांगे-पाटील यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.



